

Daund Taluka Mumbai Solapur Highway Crime Incident
रावणगाव : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर देवदर्शनासाठी निघालेल्या एका कुटुंबाला अडवून कोयत्याचा धाक दाखवून लुटल्याची धक्कादायक घटना स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथे घडली आहे. इतकेच नाही, तर नराधमांनी यातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी बलात्कार, चोरी अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं काय घडलं?
बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी (दि. ३०) पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. एक कुटुंब आपल्या चारचाकी वाहनाने प्रवास करत असताना चहा पिण्यासाठी स्वामी चिंचोली येथे थांबले होते. चहा घेऊन ते पुन्हा गाडीत बसत असताना, दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांना अडवले.
हल्लेखोरांनी कुटुंबातील महिला आणि पुरुषांच्या गळ्याला कोयता लावून जीवे मारण्याची धमकी दिली. एकाने त्यांच्याकडील सर्व सोन्या-चांदीचे दागिने हिसकावून घेतले. चोरट्यांनी गाडीतील महिलांच्या अंगावरील एकूण दीड लाख रुपयांचे दागिने चोरले.
मुलीवर अत्याचार
लुटमार करत असताना यातील एका चोराने गाडीतील अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने काही अंतरावर ओढत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. चहासाठी जिथे थांबले होते त्याच्या लगत झाडझुडपं आहेत. चोरट्यांनी पीडित मुलीला फरफटत झाडझुडपांमध्ये नेलं.
या अमानुष घटनेमुळे कुटुंबाला मानसिक धक्का बसला आहे. दौंड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. दौंड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अज्ञात आरोपींचा कसून शोध घेत आहेत.