

पुणे : साडेसात लाख रुपये रोख, सोन्याची अंगठी आणि सर्व संसारोपयोगी वस्तू असे 25 लाख रुपये खर्च करून लग्न लावून दिले. मात्र, त्यानंतरदेखील वेळोवेळी आई-वडिलांनी लेकीच्या संसारासाठी नातेवाईकांकडून उसने पैसे घेऊन वेळोवेळी जावयाला 50 लाख रुपये दिले. तरीही त्याने विवाहितेला मारहाण करून इमारतीच्या गॅलरीतून ढकलून देऊन तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तिचा आरडाओरडा सुरक्षारक्षक आणि इतर लोकांच्या कानावर आला. त्यांनी खालून आवाज दिल्याने विवाहितेचे प्राण वाचले. या प्रकरणी, चंदननगर पोलिसांनी पतीसह 6 जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पती प्रणिल निकुडे (वय 32), सासरे उदय निकुडे (वय 60), सासू वैशाली निकुडे (वय 55), दीर प्रतीक निकुडे (वय 30, सर्व रा. सिलिकॉन बे, वडगाव शेरी), दीर प्रमोद माणिक निकुडे (रा. दीपक पार्क, कल्याणीनगर) चुलत सासरे माणिक जगन्नाथ निकुडे (रा. दीपक पार्क, कल्याणीनगर) यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 24 वर्षांच्या विवाहितेने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2023 ते 25 जून 2025 दरम्यान घडला.
याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी सांगितले की, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला, त्याची कुणकुण लागल्याने ते कुटुंब पसार झाले आहे. त्यांच्या शोधासाठी तीन पथके तयार केली आहेत. सोसायटीतील वॉचमन व इतरांचे जबाब घेण्याचे काम करण्यात येत आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर शहर परिसरात विवाहितांचा छळ केल्याच्या तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. कात्रजमधील आंबेगाव परिसरात पतीच्या छळामुळे एका महिलेने सहा वर्षांच्या मुलासह पाचव्या मजल्यावरून उडी मारल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती.