

पुणे: प्रेमसंबंधाच्या संशयातून असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करणार्या तरुणाला बंदूक दाखवून कमरेचा पट्टा आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली आहे. तसेच, पोलिस चौकीच्या बाहेर एक मुलगी उभी आहे, ती तुझ्याविरुद्ध खोटी तक्रार देईल, तुला अडचणीत आणेल, अशी धमकीदेखील तरुणाला देण्यात आली.
याप्रकरणी फुलेनगरमध्ये राहणार्या 28 वर्षांच्या तरुणाने वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आदर्श चौधरी (वय 24, रा. लोणावळा) नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना वाघोलीमधील सेंट जोसेफ कॉन्वेंट स्कूलच्या मोकळ्या मैदानामध्ये 21 जून रोजी रात्री साडेआठ वाजता घडली आहे. (Latest Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे विमाननगरमधील एका कंपनीमध्ये नोकरीला आहे. त्यांच्या कंपनीमधील तरुणीबरोबर आदर्श चौधरी याचे प्रेमसंबंध होते. एप्रिल 2025 मध्ये या तरुणीनेच फिर्यादी यांची आदर्श चौधरीबरोबर ओळख करून दिली होती, त्यानंतर ते आदर्श याच्याबरोबर कधी बोलले नाही की भेटले नव्हते.
फिर्यादी हे कंपनीत असताना आदर्श हा कंपनीच्या खाली आला असल्याचे समजल्यावर फिर्यादी यांनी फोन केला. सायंकाळी सात वाजता कंपनीतून सुटल्यावर ते कंपनीच्या दारात भेटले. थोडा वेळ गप्पा मारल्यावर आदर्शच्या दुचाकीवरून ते वाघोलीतील सेंट जोसेफ कॉन्वेन्ट स्कूलच्या मोकळ्या मैदानात गेले. तेथे गेल्यावर आदर्श हा बोलू लागला. ’माझी वाट लागली. माझे व तिचे प्रेमसंबंध संपून गेले. त्याला तू कारण आहेस, तुझ्यामुळेच सर्व काही झाले.
मी आता तुझ्या आयुष्याची वाट लावणार,’ असे म्हणून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कंबरेचा बेल्ट काढून त्याने मारू लागला. तेथेच पडलेले लाकूड उचलून त्याने पाठीत मारहाण केली. बंदूक दाखविली. मला हिने मारले कोणाला कळणार नाही, त्यानंतर आम्ही तुझ्या घरचा पत्ता काढू शकतो, असे म्हणत आदर्श बोलला की, ’विमाननगर पोलिस चौकीच्या बाहेर एक मुलगी उभी आहे, ती तुझ्याविरुद्ध खोटी तक्रार देईल व तुला अडचणीत आणेल,’ अशी धमकी देऊ लागला. त्यानंतर त्यांना तेथेच सोडून दुचाकीवरून तो निघून गेला. त्यानंतर फिर्यादी यांनी मित्राला बोलावून घेऊन घरी गेला. ससून रुग्णालयात उपचार घेऊन त्यानंतर त्याने तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक केदार तपास करत आहेत.