Pune Court Attack: पुणे जिल्हा न्यायालयाच्या दारातच रक्तरंजित थरार; गोळीबाराचा प्रयत्न, कोयत्याने सपासप वार

शिवाजीनगर न्यायालयाबाहेर मंदार किवळे यांच्यावर प्राणघातक हल्ला; न्यायालय परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Pune Court Attack
Pune Court AttackPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: न्याय मागण्यासाठी नागरिकांनी ज्या न्यायालयाची पायरी चढायची, त्याच न्यायालयाच्या प्रवेशद्वाराबाहेरच जीवघेणा हल्ला होत असेल, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी कोण देणार? पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर बुधवारी (२५ नोव्हेंबर) भर दुपारी घडलेल्या घटनेने हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या मंदार मारुती किवळे (वय ३५, रा. कात्रज) याच्यावर हल्लेखोरांनी गोळीबाराचा प्रयत्न करीत कोयत्याने सपासप वार केले. न्यायालय परिसरातील पोलिस बंदोबस्त, वकिलांची वर्दळ आणि नागरिकांची उपस्थितीए यांची तमा न बाळगता झालेल्या या हल्ल्यामुळे पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेचे वास्तव पुन्हा चर्चेत आले आहे.

Pune Court Attack
Junnar Leopard: महिलेचा बळी घेणारा बिबट्या २४ तासांत जेरबंद; भोईरवाडीत वनविभागाला यश

दुपारी सव्वाच्या सुमारास ही घटना घडली. किवळे हा २०२५ मध्ये कात्रज येथील शुभम चव्हाण हत्या प्रकरणातील आरोपी असून, अलिकडेच जामिनावर कारागृहातून बाहेर आला होता. बुधवारी या प्रकरणाच्या सुनावणीसाठी तो न्यायालयात आला होता. कामकाज संपवून बाहेर पडल्यानंतर दुचाकींवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करीत त्याच्यावर हल्ला केला. त्याच्या दोन्ही हातांवर आणि डोक्याच्या मागील बाजूस गंभीर वार झाले. घटनास्थळावरून पोलिसांनी दोन पिस्तुले आणि मॅगझिन जप्त केले आहे.

Pune Court Attack
Pune Educational Survey: पुण्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा होणार सर्व्हे; शिक्षणातील गळती रोखण्यासाठी विद्यापीठाचा पुढाकार!

हल्लेखोरांची ओळख पटविण्याचे आणि त्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू असल्याचे गुन्हे शाखेचे उपायुक्त गौहर हसन यांनी सांगितले. गंभीर जखमी झालेल्या किवळे याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे न्यायालयात येणारे पक्षकार, वकील, कर्मचारी आणि नागरिक यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर पोलिस बंदोबस्त असतानाही हल्लेखोर शस्त्रांसह पोहचलेच कसे, हा मूलभूत प्रश्न आहे. न्यायालय परिसरातील सुरक्षाव्यवस्था, प्रवेश नियंत्रण आणि पोलिसांच्या गस्तीचे नव्याने मूल्यमापन करण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे.

Pune Court Attack
Pune FDA Food Safety Action: पुणे विभागात एफडीएची मोठी कारवाई; २६.३३ कोटींचे अन्नपदार्थ जप्त, ४०५ जणांना अटक!

न्यायालयाच्या दारात रक्ताचा सडा

शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट क्रमांक ४ बाहेर मंदार किवळे याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याने पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गंभीर जखमी व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असताना मदतीसाठी पुढे येण्याऐवजी नागरिक व्हिडीओ बनवत उभे राहिले. साक्षीदार होण्याची भीती, पोलिसांच्या चौकशा, न्यायालयीन फेऱ्या आणि सुडाच्या धास्तीमुळे नागरिक मदतीपासून दूर राहतात. सर्वोच्च न्यायालयाने ‘गुड समॅरिटन’ मार्गदर्शक तत्त्वांद्वारे मदतकर्त्यांना संरक्षण दिले आहे. परमानंद कटारा निकालानुसार जखमीला तातडीने उपचार मिळणे प्राधान्याचे आहे. मात्र, या कायद्यांची जनजागृती आणि अंमलबजावणी अपुरी आहे. न्यायालय परिसरात कडक सुरक्षा, मदतकर्त्यांसाठी त्रासमुक्त कार्यपद्धती आणि साक्षीदार संरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. आपत्कालीन प्रसंगी ११२ किंवा १०८ वर संपर्क साधावा. शहर सुरक्षित करायचे असेल, तर मदत करणेही सुरक्षित करावे लागेल, असे ॲड. समीर शेख यांनी सांगितले.

Pune Court Attack
Pune Illegal Flex Banner Rules: पुण्यात फ्लेक्सबाजी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईचा बडगा; नाव आणि फोटो असलेल्यांनाही गुन्ह्यात घेणार!

शिवाजीनगर न्यायालयातील हत्येवरून प्रशांत जगताप यांचा गृहमंत्र्यांवर हल्लाबोल

शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या आवारात ५००-६०० पोलिसांचा बंदोबस्त असतानाही भर दिवसा गोळीबार आणि कोयत्याने वार करून एकाची हत्या होणे, हे पुण्यातील ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेचे द्योतक आहे. गृह खाते आपले काहीही वाकडे करू शकत नाही, असा विश्वास गुन्हेगारांमध्ये निर्माण झाला आहे. ‘पार्टटाइम गृहमंत्री आणि फुलटाइम प्रचारमंत्री’ असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेत्यांच्या दौऱ्यासाठी ५००० पोलिसांचा फौजफाटा लावून पुणेकरांना वेठीस धरतात. मात्र, सामान्य नागरिकांच्या रक्षणासाठी ते पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. शहरात रोज कोयता गँग आणि गुन्हेगारांचा धुमाकूळ सुरू आहे. राजकारणाच्या पलिकडे जाऊन किमान जनतेच्या जिवाची पर्वा करणाऱ्यांच्या हाती कारभार द्यावा, असे आवाहन प्रशांत जगताप यांनी पुणेकरांना केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.