

पुणे : शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी-सीवेज ट्रीटमेंट प्लांट) उभारणीत शुक्रवारी (दि. 31) झालेल्या स्थायी समितीत मान्यता देण्यात आली. भैरोबा व तानाजीवाडी येथील पूर्वीचे एसटीपी पाडून नव्याने बांधण्यात येणार आहेत. तर बोपोडी, एरंडवणे, न्यू नायडू व विठ्ठलवाडीमध्ये आधुनिक इलेक्ट्रो-मेकॅनिकल तंत्रज्ञान बसविले जाणार आहे. या एसटीपींच्या नूतनीकरणासाठी तब्बल 1,223 कोटी रुपयांच्या निविदेला मान्यता देण्यात आली असून, यात 110 कोटी रुपयांची बचत केल्याचा दावा आयुक्त नवल किशोर राम यांनी केला आहे.(Latest Pune News)
महापालिकेच्या वतीने केंद्राच्या अमृत दोन योजनेअंतर्गत शहरातील सहा जुन्या एसटीपींच्या अद्ययावतीकरण आणि नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या एसटीपींची क्षमता 89 एमएलडीने वाढणार आहे. अमृत दोन योजनेतील हॅम पद्धतीनुसार करण्यात आलेल्या 842 कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून 60 टक्के निधीला मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरीत निधी संबधित ठेकेदार उभारणार आहे. यासाठी प्रशासनाने निविदा काढल्या होत्या.
याबाबत माहिती देताना आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले की, सध्या महापालिकेकडून शहरात 10 सांडपाणी प्रकल्प कार्यरत आहेत. त्यांची एकत्रित क्षमता 362 एमएलडी आहे. मात्र, हे प्रकल्प जुने असल्याने 50 टक्क्यांपेक्षा कमी क्षमतेने कार्यरत आहेत. तसेच, या प्रकल्पांमधून शुद्ध होणारे पाणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नवीन मानकांनुसार नसल्यामुळे महापालिकेला दरवर्षी 100 कोटी रुपयांहून अधिक दंड भरावा लागत आहे. 6 प्रकल्पाच्या नूतनीकरणामुळे अशुद्ध पाण्याची गुणवत्ता सुधारली जाणार आहे. यासाठी आलेल्या निविदा सुमारे 15 टक्के अधिक दराच्या होत्या. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार असे आरोप झाले होते. याची दखल घेऊन प्रशासनाने सर्वात कमी दराची निविदा सादर केलेल्या विश्वराज एन्व्हायरमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी चर्चा करून याचे दर 3.6 टक्क्यांवर आणला. त्यामुळे महापालिकेची सुमारे 110 कोटी रुपयांची बचत झाल्याचा दावा आयुक्तांनी केला.
सहा एसटीपी प्रकल्पाचे नूतनीकरण ही ‘हॅम’ (हायबिड ॲन्यूटी मॉडेल) पद्धतीने राबविला जाणार आहे. या प्रक्रियेत 60 टक्के निधी केंद्रशासन तर 40 टक्के निधी ठेकेदार कंपनी उभारणार आहे. या कंपनीने केलेल्या खर्चाची रक्कम महापालिकेकडून पुढील 15 वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने व्याजासह अदा केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण 1879 कोटींच्या संभाव्य खर्चास मान्यता देण्यात आली आहे. ही रक्कम देतांना ठेकेदाराने गुंतविलेल्या रकमेसाठी द्यायच्या अंदाजित व्याजाचाही समावेश आहे.
या निविदांमध्ये रिंग झाल्याचा आरोप होता. तसेच राजकीय दबावापोटी या घाईगडबडीत या निविदा मंजूर करण्यात आल्याचा आरोप होत होता. याबाबत आयुक्त नवल किशोर राम यांना विचारले असता, ते म्हणाले, ही सर्व कायदेशीर प्रक्रिया आहे. मी येण्यापूर्वी निविदाप्रक्रिया झाली आहे यात माझा सहभाग नव्हता. या 110 कोटींनी निविदा कमी झाली. त्यामुळे आरोपांत काही तथ्य नसून माझ्यावर राजकीय दबाव नव्हता, असे आयुक्त म्हणाले.
महापालिकेने ‘अमृत 2.0’ योजनेअंतर्गत एसटीपींचे आधुनिकीकरण करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रकल्पामुळे शहरातील सांडपाणी शुद्धीकरण क्षमतेत 89 एमएलडीने वाढ होणार आहे. त्यानुसार भैरोबा सांडपाणी शुद्धीकरण केंद्र आणि नायडू सांडपाणी शुद्धीकरण केंद्र नव्याने तयार केले जाणार आहेत. तर, नरवीर तानाजीवाडी केंद्र, बोपोडी केंद्र, एरंडवणा केंद्र तसेच विठ्ठलवाडी केंद्राच्या शुद्धीकरण यंत्रणेचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.
या सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी विश्वराज एन्व्हॉयर्मेंट कंपनीने 1,332 कोटी रुपयांची निविदा सादर केली होती. त्यांना आम्ही दर कमी करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी 110 कोटी रुपयांनी दर कमी केल्याने निविदा पालिकेच्या अंदाजपत्रकापेक्षा सुमारे साडेतीन टक्के अधिक राहिली. पंधरा वर्षांच्या कालावधीचा विचार करता हे दर परवडणारे आहेत. त्यामुळे त्याला मान्यता देण्यात आली आहे. राज्यस्तरीय तांत्रिक समितीची प्रशासकीय मान्यला मिळाल्यावरच या निविदा मंजूर होणार आहेत.
नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका