

पुणे: यंदाचे नवीन शैक्षणिक वर्ष आज सोमवार (दि.16) पासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यासाठी शाळास्तरावर उत्साही नियोजन केले आहे. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी डोरेमॉन, छोटा भीम असे पात्र; तर गुलाबपुष्प, मिठाई वाटप करून चिमुकल्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील शाळा सज्ज असल्याची माहिती विविध शाळांच्या मुख्याध्यापकांनी दिली आहे.
उन्हाळ्याच्या दीड महिन्याच्या धम्माल सुट्टीनंतर राज्यातील शाळा पुन्हा मुलांच्या किलबिलाटाने गजबजणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा आनंदाचे वातावरण पसरले आहे. विद्यार्थ्यांचे स्वागत करायला शाळांमध्ये आकर्षक सजावट केली आहे.
राज्यात शाळा सुरू होण्याची तारीख एकच असावी, या उद्देशाने गेल्या काही वर्षांपासून सरकारने 15 जून ही तारीख निश्चित केली आहे. परंतु, यंदा 15 जूनला रविवार आल्यामुळे 16 जून रोजी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुलांना शाळेबाबत आपुलकी वाटण्यासाठी पालक, माजी विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती आदींचे सहकार्य घेण्यात येणार आहे. शाळेत जाण्यासाठी नवी पुस्तके, वह्या, पेन्सील, पेन, गणवेश खरेदीसाठी गेला आठवडाभर बाजारात झुंबड उडाली आहे.
विद्यार्थ्यांना प्रसन्न वाटावे, याकरिता गेले दोन ते तीन दिवस शाळांमध्ये शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचार्यांनी फुगे, पताका लावून वर्ग सजावट केली. तसेच, फळ्यावर शुभेच्छा व स्वागताचे संदेश लिहिण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी प्रवेशोत्सवात पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांप्रमाणेच पालकांनीही शाळा सुरू होणार असल्याने तयारी केली आहे. मुलांची आवश्यक सर्व साहित्य खरेदी केली आहे. मुलांना पहिल्याच दिवशी आनंदी वातावरण मिळावे म्हणून शाळेची रंगरंगोटी, डागडुजी व व्यवस्था करण्यात आल्याची माहिती काही शाळांच्या मुख्याध्यापकांनी दिली.