Pune Bridge Collapse: 32 वर्षांपूर्वीचा जुना पूल; पाच दिवसांपूर्वीच झाली नवीन पुलाची वर्कऑर्डर!
पुणे: मावळ तालुक्यातील शेलारवाडी-कुंडमळा जोडणारा इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून दुर्घटना घडली. संबंधित पूल सुमारे 32 वर्षांपूर्वी बांधलेला असून, या ठिकाणी नवीन पूल व्हावा, अशी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत आहे.
दरम्यान, गेली तीन वर्षे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर गतवर्षी या पुलाच्या कामाला मंजुरी मिळाली असून, पाच दिवसांपूर्वी प्रत्यक्ष वर्कऑर्डर झाली आहे. एकंदरीत, या दुर्घटनेला प्रशासनाची दिरंगाईही कारणीभूत ठरली आहे. (Latest Pune News)
संरक्षण विभागाने प्रथम लोखंडी साकव पूल बांधला होता. परंतु, तो पूर्ण नव्हता. या पुलाच्या दोन्ही बाजूने उतार होता. पावसाळ्यात इंद्रायणीला पाणी आले की नागरिकांना प्रवास करणे धोकादायक झाले होते. देहूरोडकडून इंदोरीमार्गे आणि देहूरोडकडून देहूगाव, सांगुर्डी ते कॅडबरी कंपनीमार्गे कुंडमळा आणि कान्हेवाडीकडे जावे लागत होते.
25 वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार रूपलेखा ढोरे यांनी या लोखंडी पुलाला जोडून पुढे मिसाईल प्रकल्पाच्या भिंतीपर्यंत समांतर असा सिमेंटमध्ये पूल जोडला होता. तत्कालीन खासदार अण्णा जोशी यांच्या निधीतून सुमारे दहा लाख रुपये खर्चून पुलाचा काही भाग बांधण्यात आला होता.
उर्वरित फुलाचे बांधकाम तत्कालीन आमदार दिवंगत माजी आमदार दिगंबर भेगडे यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाच्या माध्यमातून तो बांधण्यात आला. यासाठी पुन्हा सुमारे दहा लाख रुपये खर्च करण्यात आला होता. रांजणखळगे असलेल्या खडकाळ भागात सिमेंटचे स्ट्रक्चर उभारून हा पूल बांधण्यात आला होता.
या पुलाला सिमेंटचे 9 खांब असून, शेलारवाडीच्या बाजूने सात सिमेंटचे खांब उभारण्यात आले होते, तर कुंडमळा बाजूने दोन खांब उभारले होते. त्यावरून लोखंडी खांब टाकून पूल जोडला होता. हा पूल तीन ते साडेतीन मीटर रुंदीचा होता, तर नदीपलीकडील बाजूच्या दोन खांबामधील अंतर अधिक होते. त्यामुळे पुलाला हादरे बसत होते. अनेक दिवसांपासून येथील पूल दुरुस्त करावा, अशी मागणी केली जात होती.
हा पूल धोकादायक असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने हा पूल कोसळला. धोकादायक पूल आणि तुटलेले कठडे, बाहेर निघालेल्या लोखंडी सळया यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली होती.
एक वर्षापूर्वी नवीन पुलाच्या कामाला मिळाली मंजुरी !
या ठिकाणी नवीन पूल व्हावा, यासाठी आमदार सुनील शेळके यांनी पाठपुरावा केला असून, गतवर्षी 4 जुलै 2024 रोजी पावसाळी अधिवेशनात नवीन पुलाच्या कामाला मंजुरी मिळाली होती. या मंजुरीवरून आमदार शेळके आणि भाजपचे तत्कालीन विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे यांच्यात श्रेयवादही रंगला होता.
त्यानंतर पुढील प्रशासकीय कार्यवाही सुरू झाली आणि पाच दिवसांपूर्वी म्हणजे 10 जून 2025 रोजी या सुमारे 6 कोटी खर्चाच्या कामाची वर्कऑर्डर झाली असून, बारा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. मंजुरीनंतर तब्बल एक वर्षाने वर्कऑर्डर निघाल्याने नवीन पुलाच्या कामाला उशीर झाल्याने प्रशासनाची दिरंगाईही या घटनेला कारणीभूत ठरली आहे.
बंदी असूनही येत होते पर्यटक !
पूल कमकुवत झाल्याने या ठिकाणी येण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती, त्याबाबतचा फलकही येथे लावण्यात आला होता. तसेच पोलिस आणि डिफेन्स प्रशासनाकडूनही पर्यटकांना मज्जाव केला जात होता. तरीही या ठिकाणी पर्यटक गर्दी करीत होते, आजही सुटीचा शेवटचा रविवार असल्याने पर्यटकांनी बंदी झुगारून गर्दी केली होती. या कमकुवत पुलावर पर्यटकांनी गर्दी केल्यानेच दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास हा पूल कोसळला आणि ही दुर्घटना घडली.

