

पुणे: गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा, यासाठी प्रत्येक गणेश मंडळाने किमान चार सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, ध्वनिप्रदूषण वाढविणारे कर्णकर्कश ध्वनिक्षेपक व लाईट- लेझर शो टाळावेत, अशा स्पष्ट सूचना पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल यांनी दिल्या.
ग्रामीण पोलिस मुख्यालयात लोणावळा, खेड, जुन्नर आणि शिरूर उपविभागातील 18 पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील 128 गणेश मंडळाध्यक्ष, पोलिस पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. या वेळी ते बोलत होते. (Latest Pune News)
बैठकीला अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय, वीज वितरण कंपनी, परिवहन, उत्पादन शुल्क अशा विविध शासकीय विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शहरासह पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही गेल्या काही दशकांत गणेशोत्सवाची परंपरा मजबूत झाली आहे. प्रत्येक गावात मंडळांनी सामाजिक उपक्रम, लोकजागृती, सांस्कृतिक कार्यक्रमांचा धागा जपला आहे. अनेक ठिकाणी मोठी गर्दी होते. त्यामुळे कायदा- सुव्यवस्था अबाधित राखून हा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी ग्रामीण पोलिसांकडून निजोजन केले जाते.
त्यानुसार अधीक्षक संदीपसिंग गिल्ल यांनी जिल्ह्यातील गणेश मंडळाच्या अध्यक्षांसोबत बैठक घेऊन सूचना केल्या आहेत. यामध्ये मंडळांनी सीसीटीव्ही बसविण्यासह स्वयंसेवक नेमून दोन सदस्यांनी रात्रीची देखरेख करणे, मंडळ व परिसर स्वच्छ ठेवणे, कचरा टाळणे, निर्माल्य नदीत न टाकता पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित करावे, महिलांशी संबंधित अनुचित घटना होणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या. मंडळाध्यक्षांच्या अडचणी जाणून घेत थेट पोलिसांशी संपर्क साधावा, असे आश्वासन दिले.
विसर्जन मिरवणुकीत वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही यासाठी नियोजन करणे आणि शासनाच्या आदेशांचे पालन न झाल्यास कायदेशीर कारवाई होईल, असा इशाराही बैठकीत देण्यात आला.
वर्गणी- देणगीसाठी जबरदस्ती नको : पोलिस अधीक्षक
गणेशोत्सव काळात कुठल्याही परिस्थितीत गणेश मंडळांनी वर्गणी किंवा देणगीसाठी नागरिकांवर जबरदस्ती करू नये, अशा स्पष्ट सूचना या वेळी पोलिसांनी दिल्या. स्वयंस्फूर्तीने मिळालेल्या देणग्या पारदर्शक पद्धतीने स्वीकाराव्यात. मात्र, जबरदस्तीने वर्गणी, देणगी घेऊ नये, असे सांगण्यात आले.
गणेशोत्सवासाठी पोलिस दल पूर्णतः सज्ज आहे. गणेशोत्सव हा श्रद्धेचा, एकोप्याचा आणि सामाजिक बांधिलकीचा उत्सव आहे. त्यामुळे मंडळांनी सीसीटीव्ही बसवून सुरक्षा वाढवावी, कर्णकर्कश ध्वनीक्षेपक व लेझर शो टाळावेत, अशा सूचना केल्या आहेत.
- संदीपसिंग गिल्ल, पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामी