

राजगुरुनगर: जिल्हा परिषदेच्या गट- गणांच्या फेररचनेत खेड तालुक्यातील गट- गणांमध्ये फार मोठ्याप्रमाणात तोडफोड करण्यात आली होती. यावर इच्छुक उमेदवारांनी हरकती घेतल्या होत्या. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी खेड तालुक्यातील पाईट, महाळुंगे आणि मेदनकरवाडी गटात मोठे बदल केले आहेत. यामुळे तालुक्यातील बदल कोणाच्या पथ्यावर पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुणे जिल्ह्यात गट-गणांच्या फेररचनेत सर्वाधिक तोडफोड खेड तालुक्यात झाल्याचे वृत्त पुढारीने दिले होते. संपूर्ण जिल्ह्यात सर्वाधिक हरकतीदेखील याच तालुक्यातून दाखल झाल्या होत्या. खेड तालुक्यात आठ गट व 16 गण झाले आहेत. यावर तब्बल 87 हरकती दाखल झाल्या होत्या. (Latest Pune News)
खेड तालुक्यात नव्याने एक गट तयार करण्यासाठी पूर्वी अस्तित्वात असलेल्या सर्व गट- गणांची मोठ्याप्रमाणात तोडफोड करण्यात आली होती. काहींच्या सोयीसाठी भौगोलिक सलगता न राखता , गटाचे अंतर, क्षेत्रफळ कशाचाही विचार न करता तोडफोड करण्यात आली होती. काही ठराविक गावे पूर्वी गटातून जाणीवपूर्वक उचलून दुस-याच गटात टाकण्यात आली होती. यामुळे मोठ्याप्रमाणात हरकती दाखल झाल्या होत्या. सर्वाधिक हरकती पाईट,
काळूस व महाळुंगे गटाबाबत दाखल झाल्या होत्या.
सर्व हरकतींची दखल घेत जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी खेड तालुक्यातील पाईट, महाळुंगे आणि मेदनकरवाडी गटात मोठे बदल केले.
गट- गणांचे बदल
वाडा- वाशेरे, कडूस- चास, रेटवडी- वाफगाव, पिंपळगाव तर्फे खेड- मरकळ या चार गटांमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. मेदनकरवाडीत काळूस गाव घेण्यात आले आहे. फेररचनेत अंत्यत सोपा असलेल्या मेदनकरवाडी गटात काळूस गाव नव्याने आल्याने हा गटथोडा कठीण झाला आहे. पाईट - आंबेठाण गटात देखील मोठे बदल करण्यात आले आहेत.