

पुणे : पुढारी वृत्तसेवा
सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचार्यांची हेल्मेटबाबत जनजागृती करण्यासाठी आरटीओकडून 20 सहाय्यक निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे निरीक्षक शहरात असलेल्या विविध सरकारी कार्यालयांमध्ये जाऊन प्रथमत: हेल्मेटबाबत जनजागृती करतील.
वाहन अपघातात दगावणार्या व्यक्तींमध्ये सुमारे 80 टक्के व्यक्ती या दुचाकी वाहन चालक, पादचारी आणि सायकलस्वार असतात. कार चालकांच्या तुलनेने दुचाकी वाहन चालकाला अपघातात मृत्यू येण्याचा धोका सातपट जास्त आहे. जितके दुचाकी वाहन चालक रस्ते अपघातात दगावतात, त्यापैकी सुमारे 62 टक्के व्यक्तींचा डोक्याला इजा झाल्यामुळे मृत्यू ओढवतो. हेल्मेटमुळे दुचाकीचा अपघात घडल्यास जीव वाचण्याची शक्यता 80 टक्क्याने वाढते. यामुळे आरटीकडून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार 20 सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येत आहे. प्रत्येकी 4 सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांचे 5 गट तयार करण्यात येत आहेत. या गटानी विविध शासकीय व निमशासकीय आस्थापनांना नियमित भेटी देऊन तेथील अधिकारी व कर्मचारी यांना हेल्मेट वापरण्याचे फायदे समजून सांगणार आहेत.
सहाय्यक निरीक्षकांकडून जनजागृतीचे काम कशा प्रकारे सुरू आहे. याबाबत लक्ष ठेवण्यासाठी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भोसले हे या जनजागृतीबाबतचा कार्यवाही अहवाल प्रत्येक आठवडयाच्या अखेरीस नियमितपणे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ.अजित शिंदे यांना सादर करतील. त्यानंतर हा अहवाल जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना सादर करतील.
आरटीओकडून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सरकारी कार्यालयात दुचाकीवर येणार्या कर्मचार्यांसाठी ही जनजागृतीपर मोहिम हाती घेण्यात आली आहे. यात प्रथमत: सरकारी कर्मचार्यांना हेल्मेटबाबतचे महत्व पटवून देऊन जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी 20 सहाय्यक निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे निरीक्षक सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये जाऊन जनजागृती करतील.
– डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे