

पुणे: गेल्या साडेपाच वर्षांत पुणे शहरात झालेल्या ६ हजार ५०० अपघातांमध्ये १ हजार ७७६ जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, सन २०२१ पासून अपघातांची संख्या सातत्याने वाढत गेली असून, २०२४ मध्ये ती १ हजार ४०३ या उच्चांकावर पोहोचली. २०२६ मध्येही परिस्थितीत फारसा फरक पडलेला नसून, १८ ऑगस्टपर्यंत ८६३ अपघातांत १९८ जणांचा बळी गेला आहे.
शहराच्या वेगवान विस्तारासोबत वाहनांची संख्या आणि रस्त्यांवरील वर्दळ वाढत असताना अपघाती मृत्यूचा प्रश्न अधिक गंभीर बनत आहे. सन २०२१ मध्ये शहरात झालेल्या ७४१ अपघातांत २५५ जणांना प्राण गमवावे लागले. २०२२ मध्ये अपघातांची संख्या वाढून ८७१ झाली, तर मृतांचा आकडा ३२५ वर पोहोचला. २०२३ मध्ये १ हजार २३० अपघातांची नोंद झाली आणि ३५१ जणांचा मृत्यू झाला. हा या कालावधीतील सर्वाधिक अपघाती मृत्यूचा आकडा ठरला.
२०२४ मध्ये अपघातांची संख्या १ हजार ४०३ वर पोहोचली, तर ३४५ जणांचा मृत्यू झाला. २०२५ मध्ये अपघातांची संख्या किंचित कमी होऊन १ हजार ३९२ झाली व मृतांची संख्या ३०२ राहिली. चालू वर्षातही अपघातांची मालिका सुरूच आहे. जानेवारी ते १८ ऑगस्टदरम्यान शहरात ८६३ अपघात झाले असून, त्यात १९८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १९६ प्राणघातक अपघातांचा समावेश आहे. जानेवारीत २७, फेब्रुवारीत २४, मार्चमध्ये ३१, एप्रिलमध्ये २१, मेमध्ये २६, जूनमध्ये २८, जुलैमध्ये २८ आणि ऑगस्टमध्ये १३ जणांचा अपघाती मृत्यू झाला.
शहरातील वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने रस्त्यांवरील वाहतुकीचा ताणही वाढला आहे. वाढती वर्दळ, वाहतूक कोंडी, वाहनांचा वेग आणि नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे अपघातांचा धोका कायम आहे. मेट्रो, उड्डाणपूल, रस्ते रुंदीकरण यांसारख्या पायाभूत सुविधांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था विस्तारत असली, तरी अपघाती मृत्यू कमी करण्याचे आव्हान कायम आहे. प्राणघातक अपघातांची कारणे शोधून त्यावर उपाययोजना करणे, धोकादायक ठिकाणांवरील वाहतूक व्यवस्था सुधारणे, वेगावर नियंत्रण ठेवणे आणि अपघातानंतर तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे यावर भर देण्याची गरज आहे.
गंभीर अपघातांत ३,६९९ जखमी
जानेवारी २०२१ ते १८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत शहरात ३,२३६ गंभीर अपघात झाले असून, त्यामध्ये ३,६९९ जण गंभीर जखमी झाले आहेत. चालू वर्षात ऑगस्टपर्यंत ४४४ गंभीर अपघातांत ५३३ जण जखमी झाले. दरम्यान, याच कालावधीत शहरात एक हजार एक किरकोळ अपघात झाले असून, त्यामध्ये १,१०६ जण जखमी झाले आहेत. २०२६ मध्ये ऑगस्टपर्यंत ११६ किरकोळ अपघातांची नोंद झाली असून, त्यात १४८ जण जखमी झाले आहेत.