

पुणे : दौंड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर ते राजगडपर्यंत पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण पट्ट्यात बिबट्यांच्या हल्ल्याची मालिका गंभीर स्वरूप धारण करीत आहे. दौंडच्या पारगावमध्ये मेंढपाळाच्या घोड्याचा बळी, जुन्नरमधील ओतूरच्या डोमेवाडीमध्ये दिवसाढवळ्या शेतमजुरावर हल्ला, आंबेगावमधील महाळुंगेत घराबाहेर वावर, अवसरी खुर्दच्या कवलीमळ्यात घराच्या पोर्चमध्ये एकाचवेळी तीन बिबटे दिसल्याची घटना, शिरूर-कान्हूर मेसाई व राजगड-घिवशी येथे अनुक्रमे वासरू व बैलाचा मृत्यू, या सर्व घटनांनी नागरिक व शेतकरी भयभीत झाले आहेत. जंगलात अन्न-पाण्याच्या कमतरतेने बिबटे गावात येत असून, पाळीव प्राण्यांसह जनावरे, लहान मुले आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. वारंवार होत असलेल्या हल्ल्यांमुळे बिबट्यांवर नियंत्रणासाठी वनविभागाकडून तातडीच्या उपाययोजनांची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.
महाळुंगे परिसरात बिबट्यांचा उच्छाद
महाळुंगे पडवळ : आंबेगाव तालुक्याच्या उत्तर भागात बिबट्यांचा उच्छाद वाढला असून, महाळुंगे पडवळ येथील माळवाडी परिसरात बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सामाजिक कार्यकर्ते नवनाथ जंबूकर यांच्या शेतपरिसरात बिबट्याने ठाण मांडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
या परिसरात तब्बल 5 बिबटे फिरत असल्याचा संशय स्थानिक शेतीकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. शेंद्री ओढ्यात पाण्याचे प्रमाण मुबलक असल्याने दाट झाडाझुडपात बिबटे लपून बसत असून ते दररोज शेतात वावर करताना दिसत असल्याची माहिती मिळत आहे.
नांदूर येथे रविवारी (दि. 16) रात्री बिबट्याने हल्ला करून धनगर पलाजी तांबे यांच्या मेंढीचा बळी घेतला. यापूर्वी शनिवारीही याच मेंढपाळाची घोडी बिबट्याने ठार केली होती. सलग झालेल्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांची मागणी लक्षात घेऊन वन विभागाने सोमवारी (दि. 17) पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मोहीम सुरू केली आहे.
बिबट्याचा शेतमजुरावर हल्ला
ओतूरच्या डोमेवाडीतील घटना
ओतूर : जुन्नर तालुक्यातील ओतूर हद्दीतील डोमेवाडी-खामुंडी परिसरात दिवसाढवळ्या बिबट्याने शेतमजुरावर हल्ला करून त्याला जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. 18) सकाळी सव्वादहा वाजता घडली.
गोरक्षनाथ शेळकंदे हे खामुंडी येथील सोमनाथ मंदिरालगत असलेल्या शेतात काम करत होते. लघुशंकेसाठी ते शेताच्या कडेला गेले असता झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर झडप घातली. या हल्ल्यात ते किरकोळ जखमी झाले.
हल्ल्याच्या वेळी शेळकंदे यांनी आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून शेजारील शेतकरी आणि नागरिक धावून आले. त्यांनीही आरडाओरड करताच बिबट्या पसार झाला. नागरिकांनी जखमी शेळकंदे यांना तत्काळ ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच वनपरीक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सारिका बुट्टे व वनरक्षक विश्वनाथ बेले यांनी रुग्णालयात जखमींची भेट घेत माहिती घेतली आणि पंचनामा केला.
ओतूर परिसरात बिबट्यांची संख्या वाढत असून, दिवसादेखील हल्ले होऊ लागल्याने परिसरातील नागरिक व शेतकरी भयभीत झाले आहेत. बिबट्यांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
एकाच वेळी दिसले तीन बिबटे
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद; अवसरी खुर्द- कवलीमळ्यातील ग्रामस्थांमध्ये भीती
मंचर : पुढारी वृत्तसेवा
अवसरी खुर्द-कवलीमळा (ता. आंबेगाव) येथे पुन्हा एकदा बिबट्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रवींद्र वाळके यांच्या घराच्या पोर्चमध्ये मंगळवारी (दि.18) पहाटे तीनच्या सुमारास तब्बल तीन बिबटे बसले होते. साधारण दोन ते तीन मिनिटे ते थांबल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे.
कवलीमळा येथे यापूर्वीही वारंवार बिबटे दिसत होते. गेल्या काही दिवसांपासून कवलीमळ्यात एकही कुत्रा शिल्लक नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. भरत वसंत भोर यांच्या वासरावर काही दिवसांपूर्वी बिबट्याने हल्ला केला होता. त्यातच एकाचवेळी तीन बिबटे परिसरात वावरत असल्याने नागरिकांमधील भीती अधिकच वाढली आहे.
ग्रामस्थांनी सांगितले की, “एकाच वेळी तीन बिबटे फिरताना दिसणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. मुलांना, जनावरांना बाहेर सोडण्यास भीती वाटत आहे. वन विभागाने तातडीने पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा.”
वनविभागाने या भागात गस्त वाढवावी आणि योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात घोड्याचा मृत्यू
खुटबाव : दौंड तालुक्यातील पारगावच्या हद्दीत बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळाच्या घोड्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 18) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यात मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले आहे.
मेंढपाळ आबा यशवंत पिसे हे आपल्या बकऱ्यांचा कळप घेऊन पारगावकडे चालले होते. अंधार झाल्यामुळे त्यांनी पारगाव गावच्या हद्दीत एका शेतात बकऱ्यांचा वाडा मुक्कामी थांबवला होता. मध्यरात्रीच्या सुमारास बकऱ्यांच्या वाड्याजवळ बांधलेल्या घोड्यावर उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला करीत जागीच ठार केले. ही घटना पहाटेच्या सुमारास मेंढपाळ आबा पिसे यांच्या निदर्शनास आली. यानंतर त्यांनी घटनेची माहिती वन विभागाला दिली.
त्यानंतर पिंपळगावचे वनरक्षक विरेंद्र लंकेश्वर यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. परिसरातून त्यांना नुकसानभरपाई मिळण्याची मागणी होत आहे. यापूर्वी देखील गलांडवाडी, पारगाव, केडगाव, दापोडी, राहू, खामगाव, पिंपळगाव, वाळकी, यासह आदी गावात बिबट्यांनी पाळीव प्राण्यांवर हल्ला केला आहे. आता अशा घटनांत वाढ झाल्याने पाळीव प्राणी, जनांवरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वन विभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
घिवशी येथे बैलाचा फडशा
वेल्हे : पानशेत धरण खोऱ्यात बिबट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. धरण तीरावरील घिवशी (ता. राजगड) येथे धाऊ रामा डोईफोडे यांच्या अडीच वर्षाच्या बैलाचा बिबट्याने फडशा पाडला. ही घटना रविवारी (दि. 16) सायंकाळच्या सुमारास घडली.
धाऊ डोईफोडे यांनी रानात चरण्यासाठी गायी, बैल, वासरे अशी जनावरे सोडली होती. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जनावरे घराकडे घेऊन येत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक बैलावर हल्ला केला. घटनेनंतर पानशेत वन विभागाच्या वन परिमंडळ अधिकारी वैशाली हाडवळे, वनरक्षक राजेंद्र निबोंरे स्वप्निल उंबरकर, सुनील होलगिर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
गेल्या दोन महिन्यांपासून पानशेत धरण खोऱ्यासह परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याने वन विभाग सतर्क झाला आहे.