पुणे : पुढारी वृत्तसेवा : अरबी समुद्राकडून बाष्पयुक्त वारे शहरात वाहत आहेत. त्यामुळे 3 ते 6 जून या कालावधीत शहरात विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेले तीन महिने शहरात उष्णतेने पुणेकरांना हैराण केले. गेल्या अनेक वर्षांतील सर्वात कठीण उन्हाळा असल्याची भावना पुणेकरांनी व्यक्त केली. मेच्या अखेरच्या आठवड्यात शहरात चांगला पाऊस झाला. मात्र, त्याचा गारवा काहीकाळ टिकला की उकाड्यात वाढ होत असे. यंदा हंगामात शहरात मार्च ते मे या कालावधीत 108 मि.मी. पाऊस झाला.
दरवर्षी या काळात सरासरी 130 मि.मी.पर्यंत पाऊस होतो. मात्र, यंदा मार्च, एप्रिल आणि मेचा अर्धा महिना शहरात पाऊस पडलाच नाही. त्यामुळे रात्री जास्तच उकाडा जाणवत होता. या उकाड्यातून पुणेकरांची लवकच सुटका होणार आहे. सोमवार 3 जूनपासून मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज आहे. प्रामुख्याने सायंकाळी पावसाला सुरुवात होईल. विजांचा कडकडाट अन् मेघगर्जनेसह 6 जूनपर्यंत पाऊस सुरू राहील. त्यादरम्यान शहरात मान्सून दाखल होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
हेही वाचा