आढळराव पाटील यांच्या विजयाचे गणित खेड तालुका रचणार का?

आढळराव पाटील यांच्या विजयाचे गणित खेड तालुका रचणार का?

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा : मला खेड तालुक्यातील जनतेने खासदार केले. लोकसभा मतदारसंघ शिरूर असला, तरी मी खेडचा खासदार आहे, असे नेहमी जाहीरपणे सांगणार्‍या महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना या वेळी खेडचे मतदार काय कौल देणार? याकडे शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांचे लक्ष लागले आहे.

सलग तीनवेळा खासदार राहिलेल्या आढळराव पाटील यांना तीनही वेळेला खेडने वाढते मताधिक्य दिले. सन 2019 च्या निवडणुकीत मात्र विरोधी वातावरण तयार झाले. त्याचा त्यांच्या मताधिक्यावर परिणाम झाला. साधारणपणे खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात लोकसभेला ज्या उमेदवाराची पाठराखण होते, त्या बाजूने शिरूरचा कौल असल्याचा अनुभव पूर्वी आलेला आहे. त्यामुळेच या वेळी मतदान झाल्यापासून खेड तालुक्याचा अंदाज घेतला जात आहे.

कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी

खेड तालुक्यात कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. तसेच भीमा, भामा, कळमोडी धरणांचे पाणी असल्याने बागायती शेती करणारे शेतकरी आहेत. या अनुषंगाने केंद्र सरकारने लागू केलेली कांदा निर्यात बंदी, खते, बियाणे, औषधे व औजारे यावर लावण्यात आलेला जीएसटी कर, गॅस, पेट्रोल बरोबरच दैनंदिन व्यवहारात आलेली महागाई आणि शेतमालाची बाजारभावात होणारी घसरण यामुळे मोठी नाराजी होती.

सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती ते जागतिक दर्जाचे उद्योजक

दुसर्‍या बाजूला आढळराव पाटील यांचा लोकसभा मतदारसंघाबरोबरच खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क कायम होता व आहे. पदावर नसताना विकासकामात ते विरोधी उमेदवाराला उजवे होते. राजकीय निर्णय प्रक्रियेत त्यांना ऐनवेळी राष्ट्रवादीत प्रवेश करावा लागला. त्यानंतर सहापैकी पाच आमदार आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची फौज त्यांना मिळाली. या सर्व या निवडणुकीत आढळराव पाटील यांच्या जमेच्या बाजू राहिल्या. सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती ते जागतिक दर्जाचे उद्योजक अशी ओळख, तीनवेळा खासदार राहिले तरीही साधारण व्यक्तिमत्त्व म्हणून जनमानसात आदराचे स्थान आढळराव पाटील यांना मिळाले.

खासदार नसताना पाच वर्षे जनसंपर्क कार्यालय भरलेले ठेवण्यात आढळराव यांनी खूप संघर्ष केला. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांना पक्ष बदलावा लागला. या घडामोडींनी त्यांच्या पाच वर्षांच्या मेहनतीवर काही प्रमाणात गडांतर आल्याचे प्रचार आणि मतदान प्रक्रियेत पाहायला मिळाले. दुसरीकडे निवडणुकी अगोदर राष्ट्रवादीत फुट पडली. त्याची काही प्रमाणात मतदारांमधील नाराजी अजित पवार यांच्यावर कायम राहिली.

याउलट ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती खेड तालुक्यातील मतदारांमध्ये जास्त प्रमाणात दिसून आली. त्याचा फटका उमेदवार म्हणून आढळराव पाटील यांना बसणार असल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेमुळे दुरावलेले अल्पसंख्याक मतदार तसेच विरोधी ओबीसी उमेदवारांचे ओबीसी समर्थक आढळराव यांना मागे खेचण्यात किती यशस्वी होतात ? हेदेखील निकालानंतरच उलगडणार आहे.

अनुभवी राजकारणी विरुध्द भाषणात तरबेज उमेदवारांची तुल्यबळ लढत 4 तारखेला निकाली निघणार आहे. माध्यमांनी एक्झिट पोल जाहीर केले असले, तरी तसेच घडेल असे नाही. मात्र, तोपर्यंत मतदारसंघात चर्चांना उधाण आले आहे.

कार्यकर्त्यांवर संभ्रमाचे ढग कायम

स्वतःच्या आंबेगाव मतदारसंघात आढळराव पाटील वरचढ ठरतील. तर मागीलप्रमाणे भोसरीमधून मताधिक्य मिळाले, तर आढळराव पाटील यांना विजयाची संधी उपलब्ध होणार आहे. मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी निवडणुकीच्या प्रचाराची धुरा सांभाळण्याची तयारी केली. मात्र, ती स्वीकारल्यावर नारळ फोडायला आणि त्यांचा अपघात व्हायला असा दुर्दैवी योग घडून आला.

उमेदवारीवरून खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सुरुवातीला आढे-वेढे घेतले. पुढे प्रचारात त्यांनी आघाडी घेतली. मात्र, सुरुवातीला तयार झालेले संभ्रमाचे ढग कार्यकर्त्यांच्या डोक्यावर कायम राहिले. त्यातून मताधिक्याचा पाऊस पडणार का? या प्रश्नाचे उत्तर निकालातून समोर येईल.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news