

पुणे : संपूर्ण शहरात खळबळ उडवून देणाऱ्या कोंढवा येथील बलात्कार प्रकरणात एक धक्कादायक आणि अनपेक्षित वळण आले आहे. अनोळखी डिलिव्हरी बॉयने घरात घुसून बलात्कार केल्याची तक्रार देणारी महिला आणि पोलिसांनी ताब्यात घेतलेला तरुण हे गेल्या वर्षभरापासून एकमेकांच्या संपर्कात होते, अशी खळबळजनक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. इतकेच नव्हे, तर त्यांच्यातील संबंध हे सहमतीने होते, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केल्याने या प्रकरणाला पूर्णपणे कलाटणी मिळाली आहे.
या प्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, या तरुणाला ताब्यात घेतले असून 500 सीसीटीव्ही तपासले आहेत. अद्याप पर्यंत अटक करण्यात आली नाही. मात्र 200 क्राईम ब्रँच आणि 300 स्थानिक पोलिसांनी तपास केल्यानंतर हा धक्कादाय प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि ताब्यात घेण्यात आलेला तरुण हे दोघेही एकमेकांना ओळखतात. गेल्या एक वर्षापासून ते संपर्कात होते. हा तरुण अनेकदा बाणेर येथून महिलेसाठी पिझ्झा आणि बर्गर यांसारखे खाद्यपदार्थ तिच्या घरी पाठवत असे. घटनेच्या दिवशी सकाळी साडेपाच वाजता दोघांमध्ये व्हॉट्सॲपवर संवाद झाला होता. त्यानंतर सकाळी सातच्या सुमारास तो तिच्या फ्लॅटवर आला आणि साडेआठ वाजता निघून गेला.
यादरम्यान, त्यांचा आणखी एक ओळखीचा मित्र फ्लॅटवर आला होता. त्याने काही सेल्फी काढले आणि तो निघून गेला. मात्र, नंतर या सेल्फी छायाचित्रांशी छेडछाड करून त्यावर काहीतरी लिखाण करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या सर्व घडामोडींनंतर, तक्रारदार महिलेने स्वतःची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे पोलिसांना सांगितले आहे. पोलिसांनी तिची ससून रुग्णालयात मानसिक तपासणी केली असून तिचे समुपदेशन देखील करण्यात आले आहे. तिचे नातेवाईक आल्यानंतर अधिक तपास केला जाईल आणि त्यानंतरच लैंगिक अत्याचार झाला होता की नाही, हे स्पष्ट होईल, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.
सध्या पोलिसांनी तरुणाला ताब्यात ठेवले असले तरी अद्याप अटक केलेली नाही. महिलेने दिलेली तक्रार आणि तपासात समोर आलेली माहिती यात मोठी तफावत असल्याने पोलीस अत्यंत सावधगिरीने पाऊले टाकत आहेत. या प्रकरणात खोटी तक्रार दिल्याबद्दल काय कारवाई करता येईल, याची कायदेशीर बाजूही पोलीस तपासून पाहत आहेत. सखोल तपासानंतरच पुढील कारवाईची दिशा ठरवण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले.