

बारामती: अल्पवयीन मुलीशी शरीरसंबंध ठेवत तिला धमकाविल्याप्रकरणी दोघाांविरोधात अत्याचारासह अॅट्रॉसिटी, बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
दादा ऊर्फ ऋतिक वायकर (रा. करंजेपूल, ता. बारामती) आणि बाळा ऊर्फ दयानंद होळकर (रा. होळ, ता. बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत संबंधित अल्पवयीन मुलीने फिर्याद दाखल केली. दि. 1 जून रोजी व त्यानंतर ही घटना घडल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. (Latest Pune News)
दादा वायकर याने या मुलीच्या वाढदिवसादिवशी तिला फोन केला. तुला वाढदिवसाचे गिफ्ट द्यायचे आहे, तू लोखंडी पुलाच्या पलिकडे ये, असे सांगून बोलावून घेतले. तेथे अंधारात लोखंडी पुलाच्या पलिकडे गेल्यानंतर त्याने जबरदस्तीने तिला विहिरीजवळ बांधलेल्या एका खोलीत नेऊन तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले.
याबाबत तू कोणाला काही सांगितले, तर तुला खल्लास करून टाकीन, अशी धमकी दिली. दरम्यान, होळकर याने ही युवती घरी एकटी असताना तिच्या घरामध्ये घुसून ती ओरडू नये, यासाठी तोंड दाबून जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. ही गोष्ट कोणाला सांगितली तर तुझ्या भावाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.
त्यानंतर काही दिवसांनी वायकर याने तिला त्याचा मित्र सनी यादव (रा. वाघळवाडी, ता. बारामती) याच्या घरी नेले. तेथे त्या वेळी कोणीही उपस्थित नव्हते. त्याने तेथे देखील तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. हा प्रकार कोणाला सांगितला तर मी तुझे वाटोळे करेन, तुझे लग्न होऊ देणार नाही, तसेच तू जर हा प्रकार पोलिसांना सांगितला, तर मी जेलमधून सुटल्यावर तुला व तुझ्या घरातील एकालाही जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.