

पुणे: व्यावसायिक राणा सूर्यवंशी यांच्यावरील हल्ला प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागली आहे. राणा यांनी स्वतःवर हल्ला घडवून आणल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. दोन आरोपींच्या अटकेनंतर ही माहिती समोर आली आहे.
ज्या तीन व्यक्ती राणाच्या निकटवर्तीय आहे, त्याच तिन्ही व्यक्ती राणा वापरत असलेल्या डिफेंडर गाडीमधून सुपारी घेतल्या व्यक्तीला भेटल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. हे तिघेही राणा यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापर्यंत त्यांच्याबरोबर होते.
मात्र, पोलिसांच्या संशयाची सुई यांच्याकडे वळाल्यानंतर तिघेही फोन स्वीचऑफ करून गायब झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. त्यातच पोलिस महासंचालकांना यापूर्वी लिहिलेल्या पत्रामुळे विविध शंका-कुशंकांची चर्चा देखील सुरू झाली आहे.
दत्त कला शिक्षण संस्था बळकावण्याचा प्रयत्न, पोलिस अधिकाऱ्यांशी संगनमत करून निरपराधांना खोट्या गुन्ह्यांत अडकविणे आणि पोलिस संरक्षणाचा कथित गैरवापर केल्याचे आरोप करीत कौशल्यादेवी लालसाहेब जगताप यांनी दि. २९ सप्टेंबर रोजी पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीतील आरोपांची चर्चा सुरू असतानाच दि. १८ ऑक्टोबरला बारामतीत राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर हल्ला झाला.
निवेदनानुसार, रामदास झोळ आणि माया झोळ यांनी स्थापन केलेल्या दत्त कला शिक्षण संस्थेत सूर्यवंशी यांनी २०१९ पासून हस्तक्षेप वाढवून उपाध्यक्षपद मिळविल्यानंतर वाद निर्माण झाला. संस्था व संबंधित मालमत्तेवर नियंत्रण मिळविण्याचा, तसेच कर्मचारी आणि संचालकांवर दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला होता.
सोलापूरचे तत्कालीन पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याशी राणा यांचे संबंधाबाबत या निवेदनात लिहिले आहे. झोळ कुटुंबीयांविरुद्ध दाखल गुन्हे आणि राणा यांना मिळणाऱ्या पोलिस संरक्षणाबाबतही निवेदनात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
या सर्व आरोपांची स्वतंत्र चौकशी करून राणा यांना पोलिस संरक्षणाची आवश्यकता, शासकीय वाहनांचा वापर आणि संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका तपासण्याची मागणी केली होती. त्यामुळे हल्ल्यामागचे नेमके कारण काय होते, हे फरार झालेल्या राणा यांच्या निकटवर्तीय व्यक्ती ताब्यात आल्यानंतरच समोर येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.