Pune Dengue Cases: डेंग्यूने चिमुकलीच्या मृत्यूनंतर महापालिकेला जाग! आठ मृत्यूंबाबत तपासणी सुरू

प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी
Dengue
DenguePudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: डेंग्यूमुळे आठ वर्षांच्या मुलीचा नुकताच पुणे महापालिका हद्दीत मृत्यू झाल्याने डेंग्यूबाबत आरोग्य यंत्रणा दक्ष झाल्या आहेत. शहरात जानेवारीपासून आतापर्यंत डेंग्यूचे आठ संशयित मृत्यू झाले असून, आठ वर्षांच्या मुलीच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाला आता जाग आली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने बैठक घेऊन डेंग्यूप्रतिबंधक उपाययोजनांसाठी कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे.

प्राथमिक अंदाजानुसार, डेंग्यूने मृत्यू झाल्याची शक्यता असलेल्या आठही प्रकरणांतील अंतिम अहवाल अद्याप आलेले नाहीत.

वैद्यकीय लेखापरीक्षण करूनच या मृत्यूंच्या कारणांची खातरजमा केली जाणार असल्याचे महापालिका आरोग्य विभागाने स्पष्ट केले. मात्र, लोहगावमधील आठ वर्षांच्या मुलीच्या मृत्यूबाबत रुबी हॉल रुग्णालयाने प्रसिद्धीस दिलेल्या माहितीनुसार, या मुलीला रुबीमध्ये येण्यापूर्वी चार-पाच दिवस ताप आणि पोटदुखीचा त्रास होत होता. त्यावर ती स्थानिक दवाखान्यात उपचार घेत होती.

‘रुबी’मध्ये तिची तपासणी करण्यात आली असता, तिला डेंग्यूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर डॉ. प्रशांत उदवंत यांनी तिला रुग्णालयात दाखल करण्यास नातेवाइकांना सांगितले. मात्र, तिचे कुटुंबीय लोहगावमध्ये राहत असल्याने तेथील जवळच्या रुग्णालयात तिला दाखल केले गेले.

Dengue
Pune Dam Water Storage: मुठा कालव्यातून शेतीला पाणीपुरवठा सुरूच; पाणीवाटपासाठी कालवा सल्लागार समितीची महिनाअखेरीस होणार बैठक

त्यानंतर एका दिवसातच मुलीची प्रकृती खालावली. त्यामुळे तिला पुन्हा ‘रुबी’मध्ये आणण्यात आले. त्या वेळी तिची स्थिती गंभीर होती. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण, प्रकृतीत गुंतागुंत निर्माण होऊन तिचा मृत्यू झाला, असे ‘रुबी’ने नमूद केले. या प्रकरणानंतर महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेचा ढिसाळ कारभार समोर आला असून, आता रुग्णालयांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी मोठी पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे.

प्रतिबंधात्मक उपायोजना

पुणे महापालिकेने डेंग्यू प्रतिबंधात्मक उपायांसाठी मलेरिया, अतिक्रमण, बांधकाम आणि शिक्षण या विभागांच्या प्रतिनिधींना आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या असून, याच्या तपासणीची मोहीम तीव्र करण्याचे निर्देश दिले आहेत.

तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी होत नसल्यास तातडीने संबंधितांवर कठोर कारवाई करावी. जंतूनाशक फवारणी करावी, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

पाण्याच्या टाक्या झाकून ठेवा

पावसाळ्यानंतर डासांचा वाढता प्रादुर्भाव आणि डेंग्यूच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य आणि कीटकजन्य रोग नियंत्रण विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना तीव्र केल्या आहेत.

शहरात गेल्या दोन महिन्यांत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली असून, गेल्या काही दिवसांत डेंग्यूमुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटनाही समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरातील पाण्याच्या टाक्या आणि भांडी झाकून ठेवावीत, पाणी साठविणाऱ्या भांड्यांच्या आतील बाजू नियमित घासून स्वच्छ कराव्यात आणि डासांच्या अळ्या आढळल्यास तातडीने महापालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

तातडीची बैठक : डेंग्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करण्यात आले.

Dengue
Land Records Employees Salary: दिवाळी तोंडावर, पाच महिन्यांपासून पगार नाही! भूमी अभिलेख विभागातील ९०० कर्मचारी हवालदिल

अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश : अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी गुरुवारी सायंकाळी संबंधित विभागांची तातडीची बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या.

मार्गदर्शक सूचना जारी : शुक्रवारी आरोग्य विभागाने डेंग्यू आणि चिकुनगुनियापासून बचावासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या.

डेंग्यू प्रतिबंधासाठी महापालिकेच्या सूचना

स्वच्छ पाण्यात डासांची उत्पत्ती : डेंग्यूचा प्रसार करणारा ‘एडिस इजिप्ती’ डास प्रामुख्याने साचलेल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालतो.

पाण्याचे साठे झाकून ठेवा : घरातील पाण्याच्या टाक्या, ड्रम, बादल्या आणि इतर पाणी साठविणारी भांडी सुरक्षितपणे झाकून ठेवावीत.

भांडी नियमित स्वच्छ करा : नवीन पाणी भरण्यापूर्वी भांड्यांच्या आतील बाजू व्यवस्थित घासून स्वच्छ कराव्यात.

सोसायट्यांसह घरांमध्येही काळजी घ्या!

टाक्यांची झाकणे सुरक्षित ठेवा : गृहनिर्माण सोसायट्यांनी भूमिगत आणि छतावरील पाण्याच्या टाक्यांची झाकणे व्यवस्थित असल्याची खात्री करावी.

भंगार साचू देऊ नका : छतावर किंवा परिसरात जुने टायर, प्लास्टिकचे डबे, नारळाच्या करवंट्या आणि कचरा साचू देऊ नये. त्यात पावसाचे पाणी साचल्यास डासांची उत्पत्ती होऊ शकते.

अळ्यायुक्त पाण्याची योग्य विल्हेवाट : ड्रम किंवा बादल्यांमध्ये डासांच्या अळ्या आढळल्यास ते पाणी नाल्यात सोडू नये. ते थेट जमीन किंवा मातीवर टाकावे.

मच्छरदाणीचा वापर करा : विश्रांतीच्या वेळी मच्छरदाणी वापरावी.

गप्पी मासे सोडण्याचा सल्ला : ज्या ठिकाणी पाणी रिकामे करणे शक्य नाही, तेथे डासांच्या अळ्यांवर नियंत्रणासाठी गप्पी मासे सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

खडकवासला-सिंहगड रस्‍ता परिसरात डेंग्यूची साथ

दाट लोकसंख्येच्या नांदेड, किरकटवाडी, खडकवासलासह सिंहगड रस्‍ता परिसरात डेंग्यूची साथ सुरू असून, गेल्या महिनाभरापासून तापाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागासह खडकवासला येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाने कीटकनाशके फवारणीसह अंतर्गत रस्ते, ओढे-नाले, गल्लीबोळात साफसफाई मोहीम सुरू केली आहे. साथ नियंत्रण कक्ष गावोगाव तैनात करण्याची मागणी स्थानिक नगरसेविका धनश्री कोल्हे यांनी केली आहे.

सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील चार प्रभागांत आतापर्यंत ११२ डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. खासगी दवाखाने, हाॅस्पिटलमध्ये तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे यांच्या देखरेखीखाली या परिसरात डेंग्यूच्या साथ रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रतिबंधक उपाययोजना सुरू केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news