

Pune Rain News Today Ekta Nagar Flood Like Situation
पुणे : पुण्यात शुक्रवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली असून पुणे शहर आणि जिल्ह्यात पावसामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून, काही ठिकाणी मोठी वाहतूक कोंडीही झाली. तर एकता नगर येथे पाणी शिरले असून सात ते आठ इमारतींना याचा फटका बसला आहे. पार्किंगमधील गाड्या बाहेर काढताना नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
शुक्रवारी दुपारपासून राज्यातील मुंबई, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र, छ. संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, जळगाव, धुळे या भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.पुण्यात पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने वाढ होत असल्याने दुपारी ३:०० वा. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये ३५५७४ क्युसेक विसर्ग वाढवून ४३५७१ क्युसेक्स इतका करण्यात आला. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
एकतानगरमध्ये पाणी
पुण्यातील एकता नगरमध्ये शुक्रवारी पाणी शिरले. सात ते आठ सोसायट्यांमध्ये कमरे इतके पाणी भरले असून पार्किंगमधील वाहनांचे यात नुकसान झाले. प्रशासनाने जो मातीचा बांध घातला होता तो वाहून गेल्याचा दावा स्थानिकांनी केला.
कोंढव्यात वाहतूक कोंडी
कोंढवा, वानवडी, एनआयबीएम आणि परिसरात दुपारच्या सुमारास मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. अवघ्या काही वेळातच अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. कोंढवा, वानवडी, उंड्री, पिसोळी या भागात मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांची विशेष गैरसोय झाली. कार्यालयीन वेळ असल्याने प्रमुख चौकांमध्ये वाहनांच्या रांगा लागल्या.
घोड नदीपात्रात जाणे टाळा
आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी डोंगरी भागातील पावसामुळे हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शुक्रवारी (दि. ३१) सकाळी साडेदहा वाजल्यापासून धरणाच्या सांडव्यातून करण्यात येणाऱ्या विसर्गात वाढ करण्यात आली असून घोड नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहून नदीपात्रात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
वीर धरण दुसऱ्यांदा ओव्हरफ्लो
पावसामुळे निरा खोऱ्यातील चारही धरण क्षेत्रात पाणीसाठ्याचे लक्षणीय वाढ झाली आहे. वीर धरणाच्या पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली असून गेल्या 10 ते 15 दिवस धरण दुसऱ्यांदा ओव्हरफ्लॉ झाले. शुक्रवार दिनांक दुपारी साडेतीन वाजल्यापासून 53 हजार 847 क्यूसेक्स इतका मोठा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.