

आशिष देशमुख
पुणे : शहरात यंदा सलग सहा महिने पाऊस सुरू असून, मे ते ऑक्टोबर असा सलग सहा महिने तो सुरूच होता. या कालावधीत सलग 1260 मिलिमीटर पाऊस शहरात झाला असून, 2019 नंतरचा सर्वांत मोठा पाऊस ठरला आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस राहणार असल्याने थंडीला उशिरा सुरुवात होण्याची शक्यता आहे.(Latest Pune News)
यंदा शहरात 17 ते 31 मे या कालावधीत अवकाळी पावसाने दाणादाण उडवून दिली. फेबुवारी ते एप्रिल असा तीन महिनेच उन्हाळा होता. मेमध्ये केवळ 36 मि. मी पावसाची सरासरी असताना तब्बल 270 मि. मी पाऊस झाला. त्यामुळे मेमध्येच शहरात हिरवळ दिसू लागली. मान्सूनचे आगमनही 25 मे रोजीच झाल्याने गत पन्नास वर्षांचे विक्रम मान्सूनने मोडले.
मान्सून परतला तरीही ‘अवकाळी’ जाईना गत पन्नास वर्षांत प्रथमच शहरात मान्सून मेमध्ये दाखल झाला. त्यामुळे यंदा पावसाळा लवकर संपेल, असे वाटत होते. मात्र 15 ऑक्टोबर रोजी मान्सून देशातून परतला तरीही शहरात अवकाळी पाऊस सुरूच आहे.
यंदा अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात सतत कमी दाबाचे पट्टे आणि चक्रीवादळे आली. त्यामुळे मान्सून लवकर आला. ला-निनोचा प्रभाव कमी असल्याने यंदा पाऊस सतत सुरू आहे. ऑक्टोबर महिन्यात शक्ती आणि मोंथा ही दोन चक्रीवादळे आल्याने शहरात सतत पाऊस सुरू आहे.
मेपासून जमीन कोरडी झालीच नाही.
मे महिन्यातच जमीन धूप थांबली.
धो-धो पावसाने त्याच महिन्यात डोंगर हिरवेगार झाले असे प्रथमच घडले.
जंगलातील गवताची उंची सहा फुटांपर्यंत वाढली.
शहराचे हरित छत्र 40 टक्यांनी बहरले.
शहरात सतत चिखल आणि तापमानात सतत चढउतार दिसत आहेत. त्यामुळे थंडीच्या आगमनाला उशीर होणार आहे.
जूनमध्ये 12 वर्षांतील सर्वात जास्त पाऊस बरसला.
जुलैमध्ये थोडीशी तूट जाणवली मात्र ती ऑगस्टने भरून काढली.
ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये 115 टक्के जास्त पाऊस पडला.