

पुणे : गोड, रसाळ चिकूचा हंगाम सुरू झाल्याने बाजारात चिकूची आवक वाढू लागली आहे. रविवारी गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात बेळगाव येथून 1 हजार डागांमधून चिकू विक्रीसाठी दाखल झाला. घाऊक बाजारात त्याच्या किलोला दहा ते साठ रुपये भाव मिळाला. तर, किरकोळ बाजारात 60 ते 80 रुपये किलो दराने विक्री सुरू आहे.(Latest Pune News)
तुळशी विवाह सोहळ्यास सुरवात झाल्याने बाजारात बोरांना मागणी वाढली आहे. परिणामी, त्यांच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. पावसामुळे गळती वाढल्याने बाजारात लिंबाची मोठी आवक झाली. त्या तुलनेत मागणी नसल्याने लिंबाच्या गोणीमागे शंभर रुपयांनी घसरण झाली आहे. पावसामुळे बाजारात कलिंगड, खरबूज, पपई आणि डाळिंबाची आवक घटल्याने त्यांच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले.
गुलटेकडी मार्केट यार्ड येथील फळबाजारात रविवारी (दि. 2) मोसंबी 70 ते 80 टन, संत्रा 15 ते 20 टन, डाळिंब 50 ते 60 टन, पपई 15 ते 20 टेम्पो, लिंबे सुमारे दोन ते अडीच हजार गोणी, कलिंगड 3 ते 4 टेम्पो , खरबूज 1 ते 2 टेम्पो, चिकू 1 हजार डाग, पेरू 1 हजार क्रेट, अननस 2 ट्रक, बोरे 100 ते 110 पोती तर सीताफळाची 15 ते 20 टन इतकी आवक झाली होती.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे लिंबे (प्रतिगोणी) : 100-350, मोसंबी : (3 डझन) : 130-320, (4 डझन) : 60-160, संत्रा : (10 किलो) : 300-900, डाळिंब (प्रतिकिलो) : भगवा : 60-200, आरक्ता : 5-50, गणेश : 5-25, कलिंगड : 15-22, खरबूज : 20-35, पपई : 5-25, चिकू (दहा किलो) : 100-600, पेरू (20 किलो) : 300-400, अननस (1 डझन): 100-600, सीताफळ (1 किलो) : 10-80, बोरे (10 किलो) : चमेली 220-280, चेकनट 800-900, उमराण 60-80, चण्यामण्या 650-750. सफरचंद : काश्मीर (14 ते 16 किलो) : 1000-1400, किन्नोर (10 किलो) 1600-1800, अफगाणी : 900 ते 1100.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ विभागात विक्रीसाठी दाखल झालेले चिकू.