

बारामती: पुण्यातील कोरेगाव पार्क जमिन व्यवहार प्रकरणात एक रुपयाचाही व्यवहार झालेला नाही. तरीही कागद कसा काय होवू शकतो हे मला आजपर्यंत कळालेले नाही. हे आश्चर्यकारक आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. (Latest Pune News)
बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले, या प्रकरणी आता व्यवहार करताना ज्यांच्या सह्या आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पार्थ यांच्यावर गुन्हा दाखल का नाही याबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बोलले आहेत. पुण्यातील प्रकरणात निबंधकाने व्यवहाराची नोंदणी कशी केली, असे काय घडले की त्याने चुकीचे काम केले हे चौकशीतून स्पष्ट होईल. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी चांगल्या अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. ते सत्यता तपासतील. त्यानुसार दोषींवर कारवाई होईल.
पुण्यातील प्रकरण माझ्या रक्ताच्या नात्याशी संबंधित असल्याने मी फक्त त्यासंबंधी बोलू शकतो, विरोधक इतर प्रकरणे पुढे आणत आहेत, त्यासंबंधी मला माहिती नाही. पण पुण्यातील प्रकरणातही चौकशी व्यवस्थित झाली पाहिजे. अशा प्रकारच्या चुका पुन्हा घडणार नाहीत यासाठी राज्य शासन म्हणून आम्ही योग्य ती खबरदारी घेत आहोत. ज्या व्यवहाराचा कागदच होवू शकत नाही तेथे ३०० कोटी आणि १८०० कोटी आकडे आले कसे, हा पण चौकशीचा भाग आहे. अर्थात आता व्यवहार रद्द झाला असून चौकशीतून काय ते समोर येईल असे पवार म्हणाले.
निवडणुका आल्या की आमच्यावर आरोप
निवडणुका जवळ आल्या की आमच्यावर आरोप सुरु होतात. सन २००८-०९ मध्ये ७० हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला गेला. कोणीही पुरावे देवू शकलो नाही. मी सकाळपासून रात्री उशीरापर्यंत जनतेची कामे करतो. कायद्याने, नियमाने कामे करतो. घटनेने, संविधानाने पुढे चालतो. मी कालही चुकीचे काम केले नाही, आजही करत नाही आणि उद्याही करणार नाही, असे अजित पवार म्हणाले. माझ्या नातेवाईकाने, सहकाऱ्याने किंवा अधिकाऱ्याने माझ्या नावे काही सांगितले तरी संबंधित अधिकाऱ्यांनी कोणत्याही दबावाला बळी पडू नये, चुकीचे काम करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
कागदपत्रे असतील तर तक्रारी कराव्यात
बारामतीत मी काही संस्थांसाठी किंवा माझ्या नातेवाईकांनी चुकीचे काम करून जमिनी घेतल्याचा आरोप काहींनी केला आहे. वास्तविक मी कधीही चुकीचे काम करत नाही. मेडद येथील खरेदी-विक्री संघाच्या जागेबाबत, सोनगाव येथील जागेबाबत प्रश्न उपस्थित झाले. वास्तविक मेडदच्या जागेबाबत संघाने १९९४ ला प्रस्ताव दिला होता. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून २००३ मध्ये संघाला दीड लाख रुपयांना ही जमिन मिळाली. सन २०२० मध्ये आम्ही तेथे संघाचा पेट्रोलपंप सुरु केला. मंगल कार्यालय, गोडावून अशा गोष्टी करायच्या आहेत. तरीही काही जण आरोप करत आहेत. त्यांनी कागदपत्रे असतील तर संबंधितांकडे तक्रार करावी, चौकशी व्हावी आणि जो कोण दोषी असेल तर त्याच्यावर एफआयआर दाखल व्हावा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.