Pune Porsche Car Accident | अखेर बिल्डर अगरवालसह चौघांना अखेर बेड्या

Pune Porsche Car Accident | अखेर बिल्डर अगरवालसह चौघांना अखेर बेड्या

पुणे : पुढारी वृत्तसेवा : येथील कल्याणीनगर परिसरात पोर्श कारने दोघांना चिरडणार्‍या अल्पवयीन कारचालकाचा वडील आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मंगळवारी (दि. 21) सकाळी छत्रपती संभाजीनगरमधून ताब्यात घेतले. रात्री उशिरा पोलिसांचे पथक अगरवाल याला पुण्यात घेऊन आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
दरम्यान, याच प्रकरणात हॉटेल कोझीचे मालक नमन प्रल्हाद भुतडा (वय 25, रा. ए 7, पद्म विलास इन्क्लेव्ह, वानवडी), व्यवस्थापक सचिन अशोक काटकर (वय 35, रा. साईसदन ए 2, तुकाईदर्शन, हडपसर), सहायक व्यवस्थापक संदीप रमेश सांगळे (वय 35, रा. ऑस्कर शाळेसमोर, फ्लॅट नं. 107, पद्मावती हाईट्स, केशवनगर, मुंढवा) यांनाही पोलिसांनी अटक करत अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कल्याणीनगर भागात रविवारी मध्यरात्री मोटारीने निघालेल्या दोघांना धडक दिली. या अपघातात संगणक अभियंता अनिस अवधिया आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला. अपघात प्रकरणात पोलिसांनी अल्पवयीन मुलांना मद्य उपलब्ध करून देणार्‍या हॉटेलचालकासह अल्पवयीन मुलाला कार वापरण्यास दिल्याप्रकरणी मुलाच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर अगरवाल हा पुण्यातून पसार झाला होता. गुन्हे शाखेच्या पथकाकडून त्याचा शोध घेण्यात येत होता. बांधकाम व्यावसायिक आणि त्याचा चालक छत्रपती संभाजीनगर परिसरात असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर परिसरातील एका हॉटेलमधून दोघांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी विशाल अगरवाल यांच्या कुटुंबीयांकडे विचारणा केली असता आम्हाला माहीत नसून तुमच्याकडे यंत्रणा आहे. त्याच्या वापर करून पकडा, असे सांगितले. यानंतर पोलिसांनी त्याच्या घराचे सीसीटीव्ही तपासून तीन दिशेला तीन पथके पाठवली. दरम्यान, पोलिसांना चकवा देण्यासाठी अगरवालने दुसर्‍याच्या नावावर असणारा मोबाईल आणि सिम घेतले. तसेच, स्वतःची गाडी घेतली तर पुणे पोलिस माग काढतील, ही माहिती असल्याने स्वत:च्या मालकीची एक गाडी गोव्याच्या दिशेने पाठवली, दुसरी गाडी मुंबईच्या दिशेने पाठवली, तर तिसर्‍या मागवून घेतलेल्या गाडीत स्वत: बसून छत्रपती संभाजीनगरकडे पलायन केले. चालकासह त्याच्यासोबत एक वकीलही असल्याची माहिती आहे. त्याने वापरलेल्या गाडीच्या नंबरवरून तिला जीपीएस सिस्टीम असल्याचे समजले.

यामुळे पोलिसांनी जीपीएस सिस्टीमद्वारे त्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये गाठले. गुन्हे शाखेचे पथक संध्याकाळी उशिरा त्याला घेऊन पुण्यात पोहोचले. पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अगरवालसह चत्रभूज बाबासाहेब डोळस (34, वडगाव शेरी, भाजी मार्केट, पुणे) आणि राकेश भास्कर पौडवाल (51, चव्हाणनगर, धनकवडी) यांनाही ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अप्पर पोलिस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे, सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, विश्वजित काईंगडे, पोलिस उपनिरीक्षक मोहनदास जाधव, श्रीकांत चव्हाण, कर्मचारी, प्रताप शितोळे, सुरेंद्र जगदाळे, दिलीप गोरे, अनिल कुळसाळकर यांच्या पथकाने केली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news