

Rajendra Pawar Targets Ajit Pawar
भवानीनगर: आमच्या पवार कुटुंबामध्ये प्रत्येक चुलत्याने पुतण्याची मदत केली आहे. चुलत्यांनी नेहमीच पुतण्यांवर लक्ष ठेवलेलं आहे. नवख्या उमेदवाराला किती मते मिळतात, हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनुभवलेलं आहे, असा चिमटा बारामती अॅग्रोचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काढला.
रोहित पवार यांना गेल्या काही दिवसांत अनेकवेळा अजित पवार यांनी कर्जत-जामखेडमध्ये त्यांनी दुर्लक्ष केल्याने अल्प मताने का होईना निवडून आल्याचे टोमणे मारले आहेत, त्या पार्श्वभूमीवर राजेंद्र पवार यांचा हा चिमटा होता, अशी चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली होती. भवानीनगर येथे श्री छत्रपती कारखान्याच्या वतीने शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी राजेंद्र पवार बोलत होते. (Latest Pune News)
ते म्हणाले, आमचे बंधू अजित पवार यांनी 35 वर्षे नेतृत्व केले आहे. दीड-दीड लाखाच्या मतांनी ते निवडून येतात. श्री छत्रपती कारखान्याची खुर्ची मला धार्जिणीच नाही. मी दोन वर्षांचा असताना माझे वडील आप्पासाहेब पवार हे छत्रपती कारखान्यामध्ये होते, त्यावेळी आम्ही कारखान्यावरच राहत होतो.
मी दोन वर्षांचा असताना त्यांच्या कार्यालयातील खुर्चीमध्ये येऊन बसलो, त्यावेळी त्यांनी शिपायाला बोलावून मला घरी उचलून न्यायला लावले. अजित पवार यांच्यामध्ये चुणूक दिसली म्हणून आमचे चुलते शरद पवारांनी त्यांना कारखान्यामध्ये संचालक केले व मला शेती करायला ठेवले.
आमच्या पवार कुटुंबामध्ये चुलत्यांनी नेहमीच पुतण्यांवर लक्ष दिलेलं आहे. पूर्वी आमचा दुग्ध व्यवसाय होता, अजित दादा व मी गायी आणण्यासाठी गेलो होतो, त्यावेळी दादा केबिनमध्ये बसले व मी गायीच्या शेपटाजवळ बसलो. मी नेहमीच शेपूट धरून बसलो, त्यामुळे आमची कधी बढती झालीच नाही, असे राजेंद्र पवार म्हणताच अजित पवार यांना हसू आवरता आले नाही.