

राहू: दौंड तालुक्यासह परिसरातील भाजीबाजारात शेपू, पालकाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. काही दिवसांपूर्वी जुडीला ३० ते ४० रुपये दराने विकला जाणारा पालक सध्या फक्त १० ते १५ रुपये जुडी दराने विकला जात आहे. अचानक झालेल्या या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. (Latest Pune News)
गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे पालकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. बाजारात मोठ्या प्रमाणात पालकाची आवक वाढल्याने पालकांचे दर गडगडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मजुरी, वाहतूक व खतावळ यांचा खर्चही वसूल करणे कठीण झाले आहे.
दर घसरल्यामुळे ग्राहकांना स्वस्त दरात ताजी हिरवी भाजी सहज उपलब्ध होत असली, तरी शेतकऱ्यांचे मात्र आर्थिक नुकसान होत आहे. एकीकडे पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान होत असताना दुसरीकडे दरही मिळत नाही. त्यामुळे शासनाने भाजीपाला उत्पादकांना हमीभाव द्यावा, तसेच थेट ग्राहकांपर्यंत विक्रीसाठी सोय उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शेतकरी करत आहेत
दर घसरल्याने मोठा तोटा सहन करावा लागत आहे. मेहनत करून भाजी पिकवली तरी खर्च निघत नाही. यामध्ये शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. बाळासाहेब सोनवणे, तरकारी उत्पादक शेतकरी