

पुणे: पुणे पोलिस दलातील एका पोलिस उपनिरीक्षकाने औंधमधील राहत्या घरात पिस्तुलाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. ७) दुपारी घडली. नीलेश भाऊसाहेब पाटील (वय ५५, रा. नागरस रस्ता, औंध) असे आत्महत्या केलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
पाटील हे विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात नेमणुकीस होते. त्यांच्या आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. याबाबत चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, पुणे पोलिस दलात भरती झाल्यानंतर पाटील पदोन्नतीने पोलिस उपनिरीक्षक झाले होते. उच्च न्यायालयातील कामासाठी ते बुधवारी (७ ऑक्टोबर) मुंबईला जाणार होते. मात्र, ते मुंबईला गेले नाही.
औंधमधील नागरस रोडवरील सुवर्णयुग सोसायटीत ते राहत होते. बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास ते घरी होते. त्या वेळी त्यांचा मुलगा घरात होता. घरातील सोफ्यावर बसलेल्या पाटील यांनी शासकीय पिस्तुलातून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली.
गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर त्यांचा मुलगा खोलीतून बाहेर आला. तेव्हा पाटील हे सोफ्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. मुलाने ही माहिती त्याच्या चुलत्याला दिली. पाटील यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पाटील यांना आरोग्यविषयक समस्या होत्या. गणेशोत्सवापूर्वी एक ते दोन महिने ते सुटीवर होते. गणेशोत्सवातील बंदोबस्तासाठी ते कामावर रुजू झाले होते. आरोग्यविषयक समस्या जाणवू लागल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून ते नैराश्यात होते.
त्यांच्या आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे, असे चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी सांगितले. पाटील यांच्यामागे पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. ते पूर्वी खडक पोलिस वसाहतीत राहत होते.