Pune Police Corruption: लाचखोरीत ‌‘खाकी‌’च अव्वल! महसूल विभागालाही टाकले मागे

साडेचार वर्षांत 80 पोलिस अडकले खाबुगिरीत
Bribe News
Bribe NewsPudhari
Published on
Updated on

अशोक मोराळे

पुणे: राज्यात कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचारी लाचखोरीच्या प्रकरणांत मोठ्या प्रमाणावर अडकत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

गेल्या साडेचार वर्षांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पुणे युनिटने पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण जिल्ह्यात केलेल्या कारवाईत तब्बल 80 पोलिस अधिकारी व कर्मचारी लाच घेताना, लाचेची मागणी करताना सापडले आहेत.

Bribe News
Smart City: अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची डिजिटल नजर; ड्रोन आणि एआयच्या मदतीने पुण्याचा डिजिटल सर्व्हे अंतिम टप्प्यात

विशेष म्हणजे महसूल विभागातील आरोपींच्या तुलनेत पोलिस विभागातील आकडा अधिक असल्याचे दिसून येते. त्यामुळे, “जनतेच्या संरक्षणासाठी असलेली यंत्रणाच भष्टाचारात अडकत असेल, तर सर्वसामान्यांनी न्याय कुणाकडे मागायचा?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

एसीबीच्या आकडेवारीनुसार, सन 2025 ते 13 मे 2026 या कालावधीत पुणे जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांतील भष्टाचाराविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाया करण्यात आल्या. त्यामध्ये पोलिस विभागातील अधिकारी-कर्मचारी सर्वाधिक वेळा जाळ्यात अडकल्याचे स्पष्ट झाले आहे.

तक्रारदारांकडून गुन्ह्यात मदत करणे, तपासात मदत करणे, चार्जशीटमध्ये सवलत देणे, वाहन सोडवणे, जामिनासाठी मदत करणे, अदखलपात्र गुन्ह्यात मदत करणे, अशा विविध कामांच्या मोबदल्यात पोलिसांनी लाच मागितल्याचे समोर आले आहे.

लाच प्रकणात सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, सहायक पोलिस फौजदार आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, तर काही प्रकरणांत मध्यस्थांचाही वापर करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. लाच रकमेचे प्रमाण काही हजारांपासून लाखो रुपयांपर्यंत असल्याचे समोर आले आहे.

Bribe News
Nitin Gadkari Pune visit: पालखीमार्गाचे काम 80 टक्के पूर्ण; गडकरी यांनी ताफ्यातील गाड्या कमी करून केली बसमधून पाहणी

पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत नेमणुकीस आसलेल्या वैशाली तोटेवार या सहायक पोलिस निरीक्षक महिलेने मध्यस्थामार्फत 28 लाख रुपयांची लाच घेतल्याचे प्रकरण ताजे असतानाच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील बावधन पोलिस ठाण्यात नियुक्तीस असलेल्या सहायक पोलिस निरीक्षक ज्योती तांबेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तांबे हिने एकाकडून पन्नास हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी, ज्योती पांडुरंग तांबे (वय 41) या महिला अधिकाऱ्याच्या विरुद्ध बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे.

तसेच, फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक संदीप खेडकर याच्यावर मार्च महिन्यात एसीबीने गुन्हा दाखल केला होता. लोहगाव पोलिस ठाण्यातील पीएसआय मनोज बरुटे याने अदखलपात्र गुन्ह्यात मदत करण्यासाठी 80 हजारांची लाच मागितली. ती घेताना एसीबीने त्याला रंगेहाथ पकडले.

कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदाराला एसीबीने दीड लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. धनादेश न वटल्याच्या गुन्ह्यात अटकेची कारवाई टाळण्यासाठी तसेच मदत करण्यासाठी त्याने ही लाच घेतली होती.

सर्वात गंभीर प्रकार म्हणजे पाच लाखांची लाच घेतल्यानंतर देखील आणखी लाच घेण्यासाठी तो बेडी घेऊन व्यावसायिकाला अटकेचा धाक दाखवत होता. एकंदर या घटना पाहिल्या तर असे निदर्शनास येते की, एक महिन्याच्या कालावधीत तीन पोलिस अधिकारी आणि एक कर्मचारी लाचखोरीत अडकले आहेत.

2022 ते 13 मे 2026 या साडेचार वर्षांच्या कालावधीत पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलिस दलातील 80 पोलिस अधिकारी, कर्मचारी जाळ्यात अडकले आहेत, तर याच कालावधीत महसूल विभागातील 50 जण सापळ्यात अडकले आहेत. तुलनेत पोलिस दलातील आकडा मोठा आहे.

ग्रामीण पोलिस दलात सर्वाधिक सापळे

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलिस दलाचा विचार केला, तर 2025 ते 13 मे 2026 या दीड वर्षाच्या कालावधीचा विचार केला तर पुणे ग्रामीण पोलिस दलातील नऊ पोलिस लाचखोरीत अडकले आहेत, तर हेच प्रमाण पुणे शहर पोलिस दलातील सात असून, पिंपरी-चिंचवड पोलिस दलात सहा आहे.

Pudhari

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news