Nitin Gadkari Pune visit: पालखीमार्गाचे काम 80 टक्के पूर्ण; गडकरी यांनी ताफ्यातील गाड्या कमी करून केली बसमधून पाहणी

वारीच्या काळात वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी मुख्य रस्त्यासोबतच साडेतीन मीटरची स्वतंत्र ‌‘पालखी लेन‌’ आणि सर्व्हिस रोड तयार करण्यात आला आहे.
Nitin Gadkari Pune visit
Nitin Gadkari Pune visitPudhari
Published on
Updated on

पुणे: संत ज्ञानेश्वर महाराज पालखीमार्गाच्या कामाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी गुरुवारी (दि. 14) पुण्यात आले होते. या वेळी त्यांनी ताफ्यातील गाड्या कमी करून पत्रकारांसोबत बसमधून प्रवास करत प्रत्यक्ष कामाची पाहणी केली.

पालखीमार्गाचे 80 टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या सहा महिन्यांत हा संपूर्ण मार्ग भाविकांच्या सेवेत रुजू होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.बस प्रवासादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना नितीन गडकरी म्हणाले की, वारकऱ्यांची श्रद्धा असलेल्या या मार्गासाठी 12 हजार कोटी रुपये खर्च केले जात आहेत.

Nitin Gadkari Pune visit
World Family Day: मोबाईलच्या पडद्यामागे हरवतोय कुटुंबातील संवाद

वारीच्या काळात वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी मुख्य रस्त्यासोबतच साडेतीन मीटरची स्वतंत्र ‌‘पालखी लेन‌’ आणि सर्व्हिस रोड तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असलेला हा मार्ग वारकऱ्यांसाठी सुखाचा आणि आनंददायी ठरेल.

तसेच, राज्य महामार्गांचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करून आम्ही महाराष्ट्रात 5 ते 6 लाख कोटींची कामे मार्गी लावली आहेत. पालखीमार्गामुळे वाहतूक कोंडी आणि प्रदूषणातूनही नागरिकांची सुटका होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

इथेनॉलवरील गाडी करणार लॉन्च

देशातील वाढत्या इंधन दरांवर भाष्य करताना गडकरींनी पर्यावरणपूरक पर्यायांवर भर दिला. आपल्या देशाला 87 टक्के इंधन आयात करावे लागते. आता आपल्याला आत्मनिर्भर व्हायचे असेल, तर पेट्रोल-डिझेलला पर्याय शोधणे गरजेचे आहे. आपला शेतकरी आता फक्त अन्नदाता नाही, तर तो ऊर्जादाता आणि इंधनदाता बनत आहे. येत्या 4 तारखेला मी 100 टक्के इथेनॉलवर चालणारी मारुती सुझुकीची गाडी लाँच करणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणाही त्यांनी यावेळी केली.

Nitin Gadkari Pune visit
Maharashtra Politics: परिस्थिती गंभीर होती तर निर्णय निवडणुकांनंतरच का? शरद पवारांचा मोदी सरकारला सवाल

पालखीमार्ग ठरणार ग्रीन कॉरिडोर

पालखी मार्गाच्या दुतर्फा सुमारे 50 हजार झाडे लावली जात असून, 450 जुन्या झाडांचे यशस्वी पुनर्रोपण करण्यात आले आहे. हा मार्ग फक्त रस्ता नसून तो वारकऱ्यांच्या इतिहासाची आणि श्रद्धेची साक्ष देणारा एक हरित कॉरिडॉर ठरेल. झाडांच्या हिरवेपणामुळे वारकऱ्यांचा विठ्ठलभेटीचा प्रवास अधिक सुखकर होईल, असेही गडकरींनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news