

पुणे : ‘विद्यार्थ्यांनो अंमली पदार्थांचे सेवन, व्यसन आणि वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून स्वतःला लांब ठेवा. फेशर्स पार्टीपासून दूर राहून करिअर घडवा. पोलिसांना कोणाचेही करिअर संपवायचे नसते. परंतु, अंमली पदार्थाच्या गुन्ह्यात 100 पैकी 5 जरी पकडले गेले तर ते संपले म्हणून समजा,’ असा इशारा पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. ‘महाराष्ट्र पोलिस स्थापन दिना’निमित्त कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्वामी विवेकानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
याप्रसंगी पोलिस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, संभाजी कदम तसेच एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. रविकुमार चिटणीस, सीएओ डॉ. प्रसाद खांडेकर आणि डब्ल्यूपीयूचे कुलसचिव प्रा. गणेश पोकळे उपस्थित होते.
या कार्यक्रमात शहरातील जवळपास 1 हजार पेक्षा अधिक शाळा, महाविद्यालय व कॉलेजमधील जवळपास 5 लाख विद्यार्थी ऑनलाइन माध्यमातून जोडले गेले होते. एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक-अध्यक्ष, विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड व कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा म्हणाले,‘ नशेच्या आहारी जाणारा युवा वर्ग हा शेवटी आत्महत्येपर्यंत पोहचत आहे. तसेच सायबर गुन्हे, नार्को, आर्थिक फसवणूक, वाहतूक समस्या आणि कायद्यांचे पालन न करणाऱ्या घटना वाढत आहेत. शहरात वयोवृद्धांना केंद्रित करून त्यांना डिजिटल अरेस्ट करून पैशांची मागणी होताना दिसत आहेत. अशा वेळेस गुन्हेगारीला अंकुश लावण्यासाठी नागरिकांनी 112 या नंबर वर संपर्क साधावा.” शहरातील 5 लाख विद्यार्थी हा कार्यक्रम ऑनलाइन पाहत असताना ते देश सेवा आणि पुणे शहराच्या सुरक्षेबाबात नक्कीच जागरूक होतील. डॉ. आर.एम.चिटणीस यांनी स्वागत पर भाषण करताना देशात वाढत्या आर्थिक गुन्हेगारी, सायबर सोशल मिडिया, फेक न्यूज, सायबर क्राइम यावर भाष्य केले.