तिकीट घेतल्यानंतर तिकीट स्कॅन न करता निघालेल्या व्यक्तींना स्वयंचलित अडथळा निर्माण होतो. त्यावर तिथे उपस्थित सुरक्षारक्षक तुम्हाला तिकीट स्कॅन करण्यास मदत करतो. 'हे असे अनेकांना जोरात लागले आहे का?' असे विचारल्यानंतर सुरक्षारक्षक म्हणाला, 'अनेकजण घाईत येतात, तिकीट स्कॅन न करता गडबडीत पुढे गेल्यानंतर या स्वयंचलित पट्ट्या धाडकन लागतात. त्यासाठी आम्ही मदतीला असतोच.' प्रत्येक दहा मिनिटांनी सिव्हिल कोर्ट स्थानकापासून पिंपरीसाठी मेट्रो निघते. सिव्हिल कोर्ट स्थानकावरून 12 वाजून 37 मिनिटांनी मेट्रो हलली. दोन मिनिटांत शिवाजीनगर, नऊ मिनिटांत म्हणजे 12.46 ला बोपोडी, 12.49 ला दापोडी, 12.52 ला फुगेवाडी, 12.55 ला कासारवाडी, 12.58 ला नाशिक फाटा असे करत त्यानंतर काही मिनिटांत पिंपरीला पोहोचलो. रोज वीस ते एकवीस मिनिटांत सिव्हिल कोर्टापासून ते पिंपरीपर्यंत पोहोचण्यास लागतात, असे रोज पिंपरीला कामाला जाणार्या एका कर्मचार्याने सांगितले. शिवाजीनगर मेट्रो स्टेशनवर बसलेला सृजन शेळके म्हणाला, 'माझे कॉलेज शिवाजीनगरजवळच असल्याने मला मेट्रो अतिशय सोईस्कर ठरत आहे. घरापासून पिंपरी स्टेशनपर्यंत सायकलने येतो. माझे भोसरीचे मित्रदेखील सोबत असतात, पण आज ते दोघे कागदपत्रांचे काम पूर्ण करण्यासाठी थांबले आहेत.' प्रत्येक स्टेशन आल्यानंतर मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये दरवाजा कुठल्या बाजूने उघडणार आहे,