पुणेकरांनो काळजी घ्या! पारा 40 अंशांवर; आगामी आठवडा उष्णतेच्या लाटेचा

पुणेकरांनो काळजी घ्या! पारा 40 अंशांवर; आगामी आठवडा उष्णतेच्या लाटेचा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सलग पाच दिवस सायंकाळी धो धो कोसळणारा पाऊस मंगळवारी पडलाच नाही. त्याने विश्रांती घेतल्याने पुणेकर भयंकर उकाड्याने हैराण झाले. कमाल तापमानासह आर्द्रताही वाढल्याने उष्ण व दमट वातावरणामुळे नागरिक घामाघुम झाले. शिवाजीनगरचा पारा पुन्हा 40, तर कोरेगाव पार्क आणि चिंचवडचा पारा 42 अंशांवर गेला. त्यामुळे पुढील पाच दिवस शहरात उष्णतेची लाट तीव्र राहणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळने दिला आहे.

गेले दहा ते बारा दिवस शहराचे कमाल तापमान 40 अंशांच्या खालीच होते. सतत पडणार्‍या पावसामुळे पारा 35 ते 36 अंशांवर खाली आला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडूनदेखील पारा 38 अंशांवर होता. मंगळवारी तो 40 अंशांवर गेला. शिवाजीनगरचा पारा मे महिन्यात प्रथमच मंगळवारी 40 अंशांवर गेला, तर चिंचवड, कोरेगाव पार्कचा पाराही 42 अंशांवर गेल्याने पुणेकरांना उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागल्या.

आगामी आठवडा उष्णतेच्या लाटेचा

शहराचे कमाल तापमान अचानक 3 ते 4 अंशांनी वाढल्याने शहरात पुन्हा उष्णतेची लाट तीव— होत आहे. शहरात अजूनही ढगाळ वातावरण आहे. त्यात कमाल तापमान 40 ते 42 अंशांवर जाणार आहे. असे वातावरण 27 मेपर्यंत राहणार आहे. शहराची आर्द्रता 40 वरून 62 वर गेली आहे. त्यामुळे शहरात उष्ण व दमट असे अस्वस्थ करणारे वातावरण राहणार आहे.

पाऊस झाला कमी

गेले पाच दिवस धो धो पाऊस झाला. त्यामुळे सायंकाळी जोरदार पाऊस पडल्याने हायसे वाटावे असे वातावरण होते. मंगळवारपासून मात्र शहरातील पाऊस कमी झाला असून, 27 मेपर्यंत कोरडे वातावरण राहणार आहे. त्यामुळे कमाल तापमान 40 ते 42 अंशांवर जाईल, असा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे.

पुण्यात बुधवारपासूनच उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. कमाल तापमानात वाढ होईल, तसेच 23 मेपासून उष्णतेच्या लाट अधिक तीव— होतील. रात्रीचे तापमान वाढल्याने अवस्थता वाढेल. उष्ण, दमट स्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी. भरपूर पाणी प्या, दुपारी 1 ते 4 पर्यंत बाहेर पडणे टाळा.

-अनुपम कश्यपी, निवृत्त हवामान विभागप्रमुख, पुणे

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news