पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे कॅन्टोन्मेंट, रेल्वे, पोलिस आयुक्त, विमानतळ, वायूसेना यासह शहरातील केंद्र व राज्य शासकीय कार्यालयांनी महापालिकेची तब्बल 250 कोटींची पाणीपट्टी थकविली आहे. ही थकीत पाणीपट्टी भरली नाही तर आता थेट पाणीपुरवठा तोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून त्यानुसार अखेरची इशारा नोटीस संबंधित संस्थांना बजाविण्यास सुरुवात केली आहे.
महापालिकेकडून नागरिकांसह शासकीय कार्यालयांना पाणीपुरवठा केला जातो. वापरानुसार नागरिकांनी पाणीपट्टी आकारली जाते. शहरात शासकीय आस्थापनांची संस्था मोठी आहे. या संस्थांनी पाणीपट्टीची तब्बल 250 कोटींची बिले थकविली आहेत. याबाबत महापालिकेने अनेकवेळा नोटिसा बजावून ही रक्कम वसूल होत नाही. त्यामुळे आता प्रशासनाने थेट कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार संबंधित संस्थाना आता अखेरची नोटीस बजाविण्यात येत आहे. त्यानुसार या संस्थांनी थकबाकी न भरल्यास त्यांचा पाणीपुरवठा तोडला जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
थकबाकीदारांमध्ये खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड 53 कोटी 67 लाख, गॅरीसन इंजिनीअर नॉर्थ 34 कोटी, गॅरीसन इंजिनीअर साऊथ 7 कोटी, भारतीय टपाल विभाग 45 लाख, दूरध्वनी विभाग 39 लाख, भारतील रेल्वे 10 कोटी, भारतीय पुरातत्व विभाग 40 लाख, वायू सेना 31 लाख, द पार्क्स अॅन्ड गार्डन 26 क्वीन गार्डन 4 कोटी, गुप्तवार्ता प्रबोधिनी 4 लाख, सार्वजनिक बांधकाम विभाग 4 कोटी, राज्य राखीव पोलिस दल 62 लाख, पोलिस आयुक्त कार्यालय 12 लाख, एमएसईबी 20 लाख, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 19 लाख अशा प्रमुख शासकीय कार्यालयांचा थकबाकीदारांमध्ये समावेश आहे.
हेही वाचा