सातारा : गणित विषयाची भीती विद्यार्थ्यांच्या मनातून घालवण्यासाठी खंडाळा तालुक्यातील भादे गावात अनोखी संकल्पना अंमलात आली आहे. चार भिंतीच्या वर्गखोलीतच नव्हे, तर गावात कुठेही सहजपणे दिसेल अशा ठिकाणाहून विद्यार्थ्यांना गणित शिकायला मिळावं, यासाठी भादे गावातील घराघरांच्या भिंती गणितांमधील सूत्रे, पाढे अन् प्रमेयांनी रंगल्या आहेत. ही अभिनव संकल्पना राबवली जात असल्याने भादेची गणिताचे गाव म्हणून ओळख झाली आहे.
मुलांच्या मनातील गणित, विज्ञान तसेच इंग्रजी या विषयांची भीती घालवायची असेल, तर लहानपणीच या विषयांच्या संकल्पना सहजपणे समजणे आवश्यक आहेत. गावात स्वच्छ भारत अभियानांतर्गत डिझाईन थिंकिंगचा उपयोग करून बोलक्या भिंतीद्वारे गणित, इंग्रजी, विज्ञान असे अवघड विषय सोपे करून टाकले आहेत. गणिती आकडेमोड सूत्रे, प्रमेय, इंग्रजी बाराखडी, शब्द रचना या भिंतींवरच काढून गावातील मुलांना नावीन्यपूर्ण उपक्रमाद्वारे एक वेगळी भेट दिली आहे. गावातीलच सुशिक्षित तरुणांच्या संकल्पनेतून आगळं- वेगळं गणिताचं गाव साकारू लागले आहे.
भादे गावात गणितीय विचारधारा निर्माण करण्यासाठी राबवलेला उपक्रम विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरत आहे. युवकांनी निस्वार्थी भावनेने स्वखर्चाने हे काम हाती घेऊन गावातील भिंती बोलक्या केल्या आहेत. गणितासारखा अवघड वाटणारा विषय सुलभ करण्याचा हा प्रयत्न आहे. यातून परिसर उजळून निघाला आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी निर्माण होत आहे. या आदर्श उपक्रमाची नोंद राज्यातील विविध गावांनी घेतली आहे.
भादे गावात चौथीपर्यंतच शाळा आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनात गणितातील संबोधन पक्केव्हावे. यासाठी लढवलेली ही अभिनव संकल्पना आहे. इंटिरियर डिझायनर असलेल्या उमेश पवार यांनी भिंतीवर गणितीय क्रिया रेखाटल्या. त्यामुळे भादे गावाचा आदर्श राज्यातील अन्य गावांनी घेतला आहे. हा उपक्रम पाहण्यासाठी राज्याच्या विविध ठिकाणांहून शिक्षक व शालेय विद्यार्थी येत आहेत. त्यामुळे गणित विषय माझ्या नावडीचा, रविवार माझ्या आवडीचा या गाण्याने भादे गावाची ओळख राज्यभर निर्माण झाली आहे. गावातील विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी व चालता फिरता त्यांच्यासमोर अवघड विषयसुद्धा सोपा व्हावा. यासाठी उमेश पवार यांनी गणितांचे गाव बनवण्याची संकल्पना मांडून प्रत्यक्षात ती साकारली. गावातील घरे व शौचालयांच्या भिंती बोलक्या केल्या.
भादे येथील गणिताचं गाव ही संकल्पना चांगली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता विकासासाठी मोठा फायदा होत आहे. ही संकल्पना जिल्ह्यातील अन्य गावांतही राबवण्यासाठी जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग प्रयत्नशील राहणार आहे.
– प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारीगावातील भिंती रंगवण्यात आल्या असल्याने परिसर उजळून निघाला आहे. गणित, इंग्रजी, विज्ञान यासारखे अवघड वाटणारे विषय सुलभ होऊन मुलांना अभ्यासाची गोडीही निर्माण होईल. ज्या आधारे हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून उद्याच्या भारताचा एक गणिततज्ज्ञ, शास्त्रज्ञ किंवा एक आदर्श नागरिक घडवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे.
– उमेश पवार, ग्रामस्थ भादे