Pune Airport: पुणे विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात, विमानसेवा विस्कळीत

Indian Air Force Accident: विमानाचे लँडिंग गिअर निकामी; ५ तास विमानसेवा ठप्प, मध्यरात्रीसह पहाटेची विमानसेवा विस्कळीत
Pune International Airport
Pune International AirportPudhari
Published on
Updated on

​पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर मध्यरात्री एक मोठी खळबळजनक घटना घडली. रात्री सुमारे 12 च्या सुमारास भारतीय हवाई दलाच्या एका लढाऊ विमानाचा अपघात झाला. या विमानाचे लँडिंग करताना लँडिंग गिअर निकामी झाले. या तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवरच अडकून पडल्याने धावपट्टीवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाच्या या विमानातील सर्व कर्मचारी सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी किंवा नागरी मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. धावपट्टीवर विमान अडकल्याने नागरी विमानांच्या उड्डाणांवर आणि लँडिंगवर मोठा परिणाम झाला आहे. पुणे विमानतळावर रात्रीत उतरणारी विमाने दुसऱ्या विमानतळांवर उतरवण्यात आले आहेत तर पुण्यातून उड्डाण करणारी विमाने थांबवण्यात आली आहे. पुढील चार ते पाच तास येथील विमानसेवा बंद राहण्याची शक्यता आहे, असे विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, धावपट्टी पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

भारतीय हवाई वाहतूक नियंत्रण केंद्रानुसार (एटीसी), धावपट्टीवरील अडथळा दूर करून कामकाज पूर्ववत करण्यासाठी किमान ४ ते ५ तासांचा कालावधी लागू शकतो. यामुळे अनेक विमानांचे वेळापत्रक कोलमडले असून प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

या घटनेबाबत केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुणे विमानतळावरील परिस्थितीवर मी स्वतः लक्ष ठेवून आहे. विमानतळ संचालक आणि हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मी सतत संपर्कात आहे. विमानातील कर्मचारी सुरक्षित असून, संबंधित विमान कंपन्यांना या विलंबाबाबत कल्पना देण्यात आली आहे. अंदाजे ५ तासांत सेवा पूर्ववत होईल, असा विश्वास आहे.

प्रवासाला निघण्यापूर्वी विमान कंपन्यांशी संपर्क करा...

पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आपल्या विमानाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी संबंधित विमान कंपनीशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

विमानतळावरील वाहतुकीवर काय परिणाम झाला?

रात्री झालेल्या भारतीय हवाई दलाच्या विमानाच्या अपघातामुळे रद्द झालेल्या विमानांची संख्या खालील प्रमाणे आहे.

दिनांक: १७ व १८ एप्रिल

इंडिगो – ३१ आगमन, ३४ प्रस्थान रद्द

एअर इंडिया – ३ आगमन, ३ प्रस्थान रद्द

स्पाइसजेट – २ आगमन, ३ प्रस्थान रद्द

अकासा एअर - २ आगमन, ३ प्रस्थान रद्द

एअर इंडिया एक्सप्रेस - ५ आगमन, ५ प्रस्थान रद्द

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news