Khadakwasla News : लाखो रुपये पुन्हा खड्ड्यात! वाहनचालकांना मनस्ताप

Khadakwasla News : लाखो रुपये पुन्हा खड्ड्यात! वाहनचालकांना मनस्ताप
Published on
Updated on

खडकवासला(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मुख्य पुणे-पानशेत रस्त्यावर, तसेच नांदेड फाट्यावरील दळवीवाडी-धायरी रस्त्यावर डोंगरउताराकडून येणारे पावसाचे पाणी साचून पुन्हा खड्डे पडले आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचा खर्च खड्ड्यात गेला आहे. या मार्गावरून जाणार्‍या-येणार्‍या वाहनांची संख्या मोठी आहे. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. पर्यटकही मोठ्या प्रमाणात या मार्गावरून जात असल्याने त्यांनाही वाहन चालवताना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

रस्त्यांच्या दोन्ही बाजूला पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. तसेच पावसाळी पाण्यासाठी वाहिन्या टाकलेल्या नाहीत. त्यामुळे ही समस्या निर्माण झाली. पुणे-पानशेत रस्ता सिमेंट काँक्रीटचा असल्याने त्यावर मोठे खड्डे नाहीत, मात्र कालव्याच्या फाट्यावरील दळवीवाडी रस्त्यावर खड्ड्यांचे साम—ाज्य पसरले आहे.

पाणी काढण्याची व्यवस्था नसल्याने पाणी साचून डांबरीकरण, खडी वाहून जाऊन रस्त्यावर खड्डे पडले आहेत. सिंहगड विकास समितीचे कार्याध्यक्ष इंद्रजित दळवी म्हणाले, 'वर्षानुवर्षे या ठिकाणी पावसाचे पाणी साचून रस्त्यावर खड्डे पडत आहेत. त्यामुळे अपघातही वाढले आहेत. एका बाजूला डोंगर उतार व दुसर्‍या बाजूला उंच पूल आहे. त्यामुळे मध्यभागी पाणी साचून राहते. सुरक्षित वाहतुकीसाठी प्रशासनाने तज्ज्ञांमार्फत कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.'

मालखेड-थोपटेवाडी बस बंद

सिंहगड पायथ्याच्या मालखेड -थोपटेवाडी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्ता ठिकठिकाणी खचला आहे. खराब रस्त्यामुळे या मार्गावरील पीएमपील बस सेवा बंद करून खानापूर-थोपटेवाडी मार्गे सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांचे हाल होत आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तीन वर्षांपूर्वी रस्त्याचे काम करण्यात आले. पहिल्याच पावसाळ्यात खड्डे पडून रस्त्याची दुर्दशा झाली.

बांधकाम विभागाकडे तक्रारी करूनही दखल घेतली गेली नाही. हायब्रीड अ‍ॅम्युनिटी प्रकल्पात करण्यात आलेल्या खानापूर रांजणे रस्त्याच्या कामासाठी अवजड वाहनांची मालखेड -थोपटेवाडी रस्त्यावरून वाहतूक झाल्याने हा रस्ता खड्डे पडून खराब झाला, असे बांधकाम विभागाचे अधिकारी सांगतात. मात्र, प्रत्यक्षात दोन वर्षांपासून रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या रस्त्यावर पर्यटकांसह विद्यार्थी, कामगार, शेतकर्‍यांची वर्दळ आहे. अवघ्या अडीच किमी अंतराच्या रस्त्यावर दर तीन-चार फुटांवर खड्डे पडले आहेत.

दळवीवाडी फाट्यावरील ड्रेनेज लाईनची दुरुस्ती करण्यात आली आहे. खड्डेही बुजवून डांबरीकरण करण्यात आले आहे. डोंगरउतारावरून येणारे पावसाचे पाणी रस्त्यावर साचत असल्याने रस्त्याची हानी होत आहे. त्यावर उपाय करण्यात येणार आहेत.

संदीप खलाटे, सहायक आयुक्त,
सिंहगड रोड क्षेत्रीय विभाग

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news