Pune Padvidhar Election Nomination
पुणे, पुढारी वृत्तसेवा : एरवी शासकीय कामकाजामुळे अधिकारी-कर्मचारी आणि अभ्यागतांची वर्दळ असणाऱ्या पुणे स्टेशन येथील विधानभवन परिसरात आज (दि. ५) वेगळेच चित्र पाहायला मिळाले. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने सकाळपासूनच कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थकांची पावले विधानभवनाकडे वळली. नेत्यांच्या वाहनांचा ताफा, कार्यकर्त्यांची लगबग आणि उमेदवारांसोबत आलेल्या प्रतिनिधींची गर्दी यामुळे संपूर्ण परिसर निवडणुकीच्या रंगात रंगून गेला होता.
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासाठी महायुतीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. डॉ. जाधव आणि गावडे यांच्या समर्थकांबरोबरच उमेदवारांचे प्रतिनिधीही मोठ्या संख्येने विधानभवनात दाखल झाले होते. त्यामुळे प्रवेशद्वारापासून अर्ज दाखल करण्याच्या कार्यालयापर्यंत गर्दी दिसून आली. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक असली तरी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने विधानभवन परिसराला एखाद्या विधानसभा निवडणुकीतील अर्ज भरण्याच्या दिवसासारखे स्वरूप आले होते.
सकाळपासूनच विधानभवनाकडे येणाऱ्या रस्त्यांवर कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली होती. उमेदवारांसह कार्यकर्त्यांच्या गळ्यात पक्षाचा दुपट्टा, तर कोणाच्या शर्टवर बॅच दिसत होते. छोट्या-मोठ्या गटांत कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीचीच चर्चा रंगली होती. नेत्यांचे आगमन होताच त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होत होती.
एकीकडे उमेदवारी अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव, तर दुसरीकडे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू होत्या. वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती, पदाधिकाऱ्यांची गर्दी आणि समर्थकांचा उत्साह यातून महायुतीने उमेदवारी अर्जाच्या पहिल्याच टप्प्यात आपली संघटनात्मक ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला. अर्ज दाखल झाल्यानंतरही काही काळ कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, चर्चा आणि निवडणुकीच्या पुढील रणनीतीची कुजबूज सुरूच होती. त्यामुळे दिवसभर विधानभवन परिसरावर निवडणुकीचे वातावरण ठळकपणे जाणवत होते.