Dr. Smita Yogesh Jadhav | डॉ. स्मिता जाधव यांच्या उमेदवारीचे सांगलीत स्वागत

शहरात चौका-चौकात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा; फटाक्यांची आतषबाजी; विजयाचा निर्धार
Sangli News
सांगली : पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपकडून डॉ. स्मिता योगेश जाधव यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी मारुती चौकात रविवारी पेढे वाटून, फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.
Published on: 
Updated on: 

सांगली : पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून भाजपने डॉ. स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी जाहीर करताच सांगलीतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. उमेदवारीची घोषणा होताच शहरातील विविध चौकांत कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आणि फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.

पक्षाकडून रविवारी दुपारी त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर ही बातमी सांगलीत पोहोचताच मारुती चौक, राम मंदिर चौक, सिव्हिल चौक, पुढारी भवन, वृत्तपत्र विक्रेता भवनसह विविध ठिकाणी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले. एकमेकांना पेढे भरवत आणि शुभेच्छा देत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

मारुती चौकात सायंकाळी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय साळुंखे, सरचिटणीस विशाल पवार, उपाध्यक्ष शरद देशमुख, रवींद्र वादवणे, शुभम चव्हाण, संजय मोरे, शुभम देसाई, अविनाश पाटील, सुमेध कुलकर्णी, रितेश मोहिते, दत्ता रहाटे, अथर्व माने, क्रिश पुजारी, कुणाल वैद्य, शिवप्रतिष्ठानचे हणमंत पवार, अमर सुतार, अमोल पाटील, रामभाऊ वैद्य, गणेश पवार, विनायक कुंभार, विनायक गंगधर, बजरंग माने, पृथ्वी गायकवाड, संदीप कुकडे, नगरसेवक उदय बेलवलकर, मिलिंद धामणीकर, रवींद्र काळेबेरे, भावेश नायक, समर्थ शेळके आदी उपस्थित होते.

विविध भागात झालेल्या या आनंदोत्सवामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. डॉ. स्मिता जाधव यांच्या विजयासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. तसेच पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचून प्रचाराला वेग देण्याचा निर्धार करण्यात आला.

योग्य उमेदवार, विजयी करू : सुरेश खाडे

भारतीय जनता पक्षाचे मिरजेचे ज्येष्ठ आमदार व सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, डॉ. स्मिता योगेश जाधव यांना पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. त्यांच्या विजयासाठी भारतीय जनता पक्षाकडून जे आदेश येतील, त्यानुसार आम्ही काम करू. पुणे पदवीधर मतदारसंघ हा भाजपसाठी चांगला मतदारसंघ आहे. या मतदार संघात भाजपला मानणारे मतदार मोठ्या संख्येने आहेत. पक्षाने डॉ. जाधव यांना उमेदवारी देऊन योग्य उमेदवार या मतदारसंघासाठी दिला.

सांगलीतून चांगले मताधिक्य देऊ : सुधीर गाडगीळ

सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, भारतीय जनता पक्षाकडून पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील तीन उमेदवारांची घोषणा केली आहे. सर्व उमेदवारांना शुभेच्छा आहेत. सर्व उमेदवार चांगले आहेत, पक्षांनी चांगल्या उमेदवारांची निवड केली आहे. पक्षातर्फे सांगलीतून डॉ. स्मिता जाधव यांना चांगले मताधिक्य देऊ.

मला विश्वासात घेऊनच निर्णय; एकजुटीने काम करू : शरद लाड

क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड म्हणाले, दोन वर्षांपासून पुणे विभागातील पदवीधर मतदारांची नोंदणी करण्याचे काम आम्ही करत होतो. पक्षाने पक्षहिताच्यादृष्टीने हा निर्णय घेतला असून, मी या निर्णयाचे स्वागत करतो. या निवडणुकीत मी आणि माझे सर्व सहकारी महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. त्यांच्या विजयासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करू. पक्षाच्या या निर्णयाबाबत माझी कोणतीही नाराजी नाही. पक्षाने मला विश्वासात घेऊनच निर्णय घेतला आहे. पक्षासाठी मी आजवर दिलेल्या योगदानाचा आणि केलेल्या कार्याचा विचार भविष्यात पक्षश्रेष्ठींकडून नक्कीच केला जाईल, याची मला पूर्ण खात्री आहे. पक्षाचा निर्णय हा अंतिम असून, पक्षहिताला सर्वोच्च प्राधान्य देत आपण सर्वजण एकजुटीने काम करू. स्मिता योगेश जाधव यांना विजयी करण्यासाठी माझे सर्व कार्यकर्ते काम करतील, पक्षाच्या सूचनांचे पालन करतील.

वृत्तपत्र विक्रेत्यांकडून स्वागत, आतषबाजी

येथील विक्रेता भवनसमोर विक्रेत्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी डॉ. स्मिता जाधव यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला. ‘स्मिता जाधव यांचा विजय असो’, ‘स्मितादीदी आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी विकास सूर्यवंशी, सचिन चोपडे, दत्तात्रय सरगर, विशाल रासनकर, दीपक वाघमारे, मारुती नवलाई, सागर घोरपडे, कृष्णा जामदार, नागेश कोरे, नारायण माळी, बाळासाहेब पोरे, शिवाजी जाधव, चंद्रकांत जोशी, धनंजय राजहंस, तानाजी जाधव, हनुमंत जाधव, महारुद्र कुंभार, नंदकुमार पोवाडे, दादासोा मुजावर, बंडू अष्टेकर, मच्छिंद्र रासनकर, दीपक सूर्यवंशी, बजरंग यमगर, प्रशांत साळुंखे, नारायण माळी, दत्तात्रय चव्हाण, बिपिन गवळी, राजकुमार कोळी, कमलाकर भांबुरे आदी उपस्थित होते.

शिराळा तालुक्यात जोरदार स्वागत

​शिराळा : पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने डॉ. स्मिता योगेश जाधव यांच्या नावाची घोषणा केल्याने शिराळा शहरासह जिल्ह्यात आनंद व्यक्त झाला. अंत्री बुद्रुक (तालुका शिराळा) या गावातील कन्येला ही संधी मिळाल्याने संपूर्ण तालुक्याला या मतदार संघाच्या राजकारणात थेट प्रतिनिधित्वाची संधी मिळाली. त्यामुळे शिराळा तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. पुणे पदवीधर मतदारसंघात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश होतो. या अत्यंत प्रतिष्ठेच्या व व्यापक क्षेत्र असलेल्या मतदारसंघात भाजपने डॉ. स्मिता जाधव यांच्यासारख्या अभ्यासू व नव्या उच्चशिक्षित महिला चेहऱ्याला संधी दिल्याची भावना विविध क्षेत्रातून तसेच समाजमाध्यमातून व्यक्त झाल्या.

​डॉ. स्मिता जाधव यांच्या उमेदवारीची घोषणा होताच तालुक्यात ठिकठिकाणी पेढे वाटून, फटाक्यांची आतषबाजी करत आणि एकमेकांना शुभेच्छा देत या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. ​"उच्चशिक्षित आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांची जाण असणाऱ्या डॉ. स्मिता जाधव यांच्या उमेदवारीमुळे पदवीधरांना एक खंबीर आणि सक्षम नेतृत्व मिळाले आहे," अशी भावना भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news