

पुणे: शहरात ओव्हरहेड केबलवर कारवाई तीव करण्यात आली आहे. अनधिकृतपणे केबल टाकणाऱ्या बड्या कंपन्यांवर महानगरपालिकेने फौजदारी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर आता अनधिकृतपणे ओव्हरहेड केबल टाकून इंटरनेट पुरविणाऱ्या छोट्या व्यावसायिकांवर देखील गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
महापालिकेने 1 एप्रिलपासून शहरातील बेकायदा ओव्हरहेड केबल हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. नियमांनुसार केवळ भूमिगत केबल टाकण्याची परवानगी असताना अनेक कंपन्यांनी खांबांवर आणि इमारतींवर केबलचे जाळे उभारले आहे. केबल टाकण्यासाठी महापालिकेची पूर्वपरवानगी आणि शुल्क अनिवार्य करण्यात आलेले आहे.
म्हैसूरवरून मागविले जाणार ड्रोन कटर
महापालिकेकडे केवळ 10 मीटर उंचीपर्यंत केबल काढण्याचे साहित्य असल्याने त्यापेक्षा उंचीवरील केबल काढण्यासाठी आता म्हैसूरवरून ड्रोन कटर मागविण्यात येणार असून, त्याद्वारे उंचीवरील केबल तोडण्यात येतील, अशी माहिती भिमाले यांनी दिली.
इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या छोट्या ऑपरेटरवरसुद्धा कारवाई
विविध प्रकारच्या सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांनी महानगरपालिकेकडून रीतसर परवानगी घेऊन भूमिगत केबलच टाकाव्यात, असे आदेश देत या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश भिमाले यांनी दिले होते. आता इंटरनेटसेवा पुरविणारे छोटे ऑपरेटर यांच्यावरसुद्धा फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश भिमाले यांनी दिले आहेत.
छोट्या व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा; काँग््रेासचा थेट आरोप
शहरातील ओव्हरहेड केबलवरील कारवाईत दुजाभाव होत असल्याचा आरोप करीत काँग््रेासने महापालिका प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोठ्या कंपन्यांना अभय देत छोट्या केबल व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे, तर बड्या कंपन्यांवर कारवाई केली जात नाही, असा आरोप काँग््रेासचे गटनेते रामचंद्र कदम यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी महापौर मंजूषा नागपुरे यांना पत्र देत तातडीने हस्तक्षेप करीत बैठक घेण्याची मागणी केली आहे.
नियमावली तयार होईपर्यंत कारवाई स्थगित करा : शिवसेनेची मागणी
महानगरपालिकेकडून शहरातील ओव्हरहेड केबलवर सुरू असलेल्या कारवाईमुळे पुणेकरांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याची बाब समोर आली आहे. इंटरनेटसेवा विस्कळीत झाल्याने विद्यार्थी, आयटी क्षेत्रातील कर्मचारी, व्यावसायिक तसेच स्टार्टअप्स यांचे दैनंदिन कामकाज ठप्प होत असून, शहराच्या डिजिटल प्रगतीवर याचा गंभीर परिणाम होत आहे. या विषयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज पुणे मनपा आयुक्त यांना निवेदन देऊन तत्पर स्थगिती देण्याचे आवाहन केले आहे.