

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गेल्या काही दिवसांत विद्यार्थी संघटनांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या असून, पोलिसांकडे अनेक तक्रारी दाखल झालेल्या आहेत. त्याची गंभीर दखल घेत पुणे सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी विद्यापीठाच्या आवारात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. त्यानुसार 7 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत जमावबंदी लागू करण्याचा आदेश देण्यात आला असून, आदेशाचा भंग करणार्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
विद्यापीठात शिक्षण घेणार्यांसाठी पूरक सौहार्दपूर्ण, शांततामय वातावरणाची आवश्यकता असल्याने विद्यापीठ आणि सभोवतालच्या शंभर मीटर परिसरात निर्बंध घालणे जरुरीचे असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली हाणामारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याची तक्रार, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून विद्यार्थ्यांना मारहाण अशा घटनांमुळे विद्यापीठात तणावाचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी पुणे पोलिसांना पत्र दिले होते. त्यानंतर पुणे सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी विद्यापीठाच्या परिसरात जमावबंदी लागू करण्याचे आदेश मंगळवारी (दि.7) दिले आहेत. फौजदारी संहिता प्रक्रिया 1973 च्या कलम 144 नुसार विद्यापीठ आणि सभोवतालच्या शंभर मीटर परिसरात विद्यार्थ्यांशिवाय इतर व्यक्तींना एकत्र जमण्यास, विद्यापीठात प्रवेश करण्यास प्रतिबंध, विद्यापीठ परिसरात दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशातून विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, पोलिस अधिकारी, सुरक्षा अधिकारी यांना वगळण्यात आले आहे. या आदेशाचा भंग केल्यास कलम 188 नुसार कारवाईचा इशाराही आदेशाद्वारे देण्यात आला आहे.
हेही वाचा