

Dr. Smita Yogesh Jadhav Pune Graduate Constituency Election
पुणे : पुण्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकारी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचा विशेष मेळावा उत्साहात पार पडला. आगामी विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या मेळाव्यात संस्थेच्या संपूर्ण परिवाराने महायुतीच्या/अधिकृत उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांना भक्कम पाठिंबा दर्शवला.
या प्रसंगी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा. शामकांत देशमुख, संस्थेच्या उपकार्यवाह तथा मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. निवेदिता एकबोटे यांच्यासह संस्थेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळाव्यात संवाद साधताना डॉ. स्मिता जाधव म्हणाल्या, ‘पुण्याच्या शैक्षणिक इतिहासात प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे योगदान अतुलनीय असून या संस्थेने हजारो सक्षम पदवीधर घडवले आहेत. याच संस्थेच्या मॉडर्न कॉलेजमधून आमच्या प्रचार मोहिमेचा नारळ फुटला होता. आज संस्थेच्या संपूर्ण परिवाराने दाखवलेला विश्वास आणि दिलेली भक्कम साथ माझ्यासाठी अत्यंत मोलाची आणि ऊर्जा देणारी आहे.’
या बैठकीत उच्च शिक्षणातील सद्यस्थितीतील बदल, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि पदवीधरांसाठी उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या नव्या संधी यांवर सविस्तर चर्चा झाली. स्वतः शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्याने या समस्यांची आपल्याला पूर्ण जाणीव असल्याचे सांगत, पदवीधरांचे आणि शैक्षणिक क्षेत्राचे सर्व प्रश्न विधान परिषदेत प्रभावीपणे मांडून ते सोडवण्याचा आपला ठाम निर्धार असल्याचे डॉ. स्मिता जाधव यांनी स्पष्ट केले.
मेळाव्यात उपस्थित सर्व पदाधिकारी आणि प्राध्यापकांनी डॉ. स्मिता जाधव यांना निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प केला.