पुणे महापालिका वाढत्या प्रदूषणावर उपाययोजना करीत आहे. रस्त्यावरच्या धुळीबाबत आम्ही मेट्रो प्रशासनाला उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बांधकामाच्या भोवती पत्रे, नेट लावणे तसेच पाण्याचे स्प्रिंकलर लावणे या बाबतच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे प्रदूषणात नक्कीच घट होईल. यावर युद्धपातळीवर काम सुरू आहे.
-मंगेश दिघे, पर्यावरण अधिकारी, पुणे महापालिका.
केवळ वाहन प्रदूषण हे शहरात वाढलेल्या प्रदूषणाचे कारण नाही. शहरात अलीकडच्या काळात गल्ली बोळात मोठी खोदकामे, बांधकामे वाढली. त्याची मोठी भर हवा प्रदूषणात झाली आहे. रस्त्यावरची धूळ हे एक मोठे कारण आहे.
-डॉ.बी.एस.मूर्ती, संचालक सफर संस्था
महापालिकेने नुकतेच गॅझेट प्रसिद्ध केले आहे. आत्तापर्यंत आमच्या बांधकामाच्या साइटवर पत्रा लावण्याची उंची 15 फूट एवढी होती, ती आता 25 फूट एवढी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे तेवढी उंची आम्ही वाढवली आहे. तसेच हिरव्या रंगाच्या जाळ्या बांधकामाच्या ठिकाणी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या आम्ही लावतो आहोत. तसेच बांधकामाचे ठिकाणच्या गाड्या वेळोवेळी घेऊन बाहेर काढाव्यात, अशा सूचना दिलेल्या आहेत. त्या सर्वांची अंमलबजावणी आम्ही आमच्या संघटनेतर्फे करण्याचा निर्णय घेतला आहे.
-नंदू घाटे, अध्यक्ष, मराठी बांधकाम व्यवसाय संघटना, पुणे