Pune News : ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न बघा : खा. रामदास तडस

Pune News : ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न बघा : खा. रामदास तडस

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आजपर्यंत महाराष्ट्रात अनेक स्पर्धा झाल्या. महाराष्ट्र केसरीची देखील मैदाने रंगली. पण, कुणी मोठे स्वप्न पाहिले नाही. आम्ही आता हे स्वप्न बघत आहोत. महाराष्ट्राच्या मल्लांनी ऑलिम्पिकमध्ये खेळावे असे आमचे स्वप्न आहे आणि ते सत्यात उतरविण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही आखाड्यात झुंज द्या, तुम्हाला काही कमी पडणार नाही याची काळजी आम्ही घेऊ, असे आश्वासन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांनी दिले.

प्रदीप कंद व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने 66 वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आयोजक प्रदीप कंद, कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, विलास कथुरे, ऑलंपियन नरसिंग यादव, हिंदकेसरी योगेश दोडके यांसह मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या मल्लांनी आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत खेळावे यासाठी त्यांना अधिकाअधिक सराव मिळून देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन देखिल भविष्यात करण्यात येईल. महाराष्ट्रातील मल्लांना डोळ्यासमोर आशियाई, राष्ट्रकुल स्पर्धेसारखे मोठे उद्दिष्ट ठेवल्यास त्याची कामगिरी अधिक चांगली होईल, असेही तडस यावेळी बोलले. महाराष्ट्र केसरी गटात झालेल्या माती विभागातील पहिल्या लढतीत यजमान पुणे शहरच्या अनिकेत मांगडेने अमरावतीच्या तानाजी झुंजुरकेचे तगडे आव्हान 12-10 असे परतवून लावत शानदार सलामी दिली. डाव आणि प्रतिडावाच्या पहिल्या फेरीनंतर विश्रांतीला सामना 6-6 असा बरोबरीत राहिला होता.

अन्य एका लढतीत पृथ्वीराजने आक्रमक आणि वेगवान कुस्ती करताना भारंदाज डावाचा मुक्त वापर करत शुभम जाधवला तांत्रिक आघाडीवर 10-0 असे पराभूत केले. राज्य अजिंक्यपद स्पर्धेत माती विभागातील 57 किलो वजनी गाटत सातार्‍याच्या ओंकार शिर्केने कमालीची आक्रमकता राखत नंदुरबारच्या निखिल पवारचा तांत्रिक वर्चस्वावर 10-0 असा पराभव केला. दुसर्‍या लढतीत यवतमाळच्या विनायक चव्हाणने जालनाच्या प्रदिप पवारचे आव्हान 8-7 असे एका गुणाने परतवून लावले.

कोल्हापूरच्या रोहित पाटिलने निर्विवाद वर्चस्व राखताना ज्ञानेश्वर माळीचा 10-0 असा पराभव केला. बीडच्या अतिश तोडकरने धाराशिवच्या धवलसिंह चव्हाणला अशाच 10-0 अशा फरकाने पराभूत केले. कोल्हापूरच्या ओंकार पाटीलने रायगडच्या साहिल शेखचा प्रतिकार 19-14 असा मोडून काढला. पिंपरी चिंचवडच्या प्रणव सस्तेने अभिजीतचा गुणांवरच 18-8 असा पराभव करून आपली आगेकूच कायम राखली. याच वजनी गटातून आकाश सरगर आणि सांगलीच्या निनाद बडरे यांनीही आपले आव्हान कायम राखले. याचवेळी गादी विभागातून 74 किलो वजनी गटात शुभम थोरात,अतुल नायकळ, करण फुलमाळी, वैजनाथ पाटील, स्वप्नील गुट्ट, अक्षय हिरगुडे, राकेश तांबुलकर, स्वस्तिक वाकडे यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news