पुणे : रंगबिरंगी पणत्या – दिवे, कागदी आकाशकंदील, कलरफुल मेणबत्त्या, उटणे अशा कित्येक वस्तू शारीरिक मर्यादेला बाजूला सारून दिव्यांग आणि विशेष मुलांनी, व्यक्तींनी दिवाळीनिमित्त साकारल्या आहेत. दिवाळी प्रदर्शनात त्यांच्या कलागुणांना पुणेकरांची दादही मिळत आहे. विविध संस्था-कार्यशाळांमधील दिव्यांग, विशेष मुलांनी, व्यक्तींनी नानाविध वस्तू आपल्या कौशल्याने तयार केल्या आहेत. कोणी पणत्यांना रंग देण्याचे काम केले आहे, तर कोणी कागदी कंदील तयार केले आहे आणि प्रत्येकाने मेहनतीने या वस्तू बनविल्या आहेत. 'हम किसीसे कम नहीं' हे त्यांनी दाखवून दिले असून, दिवाळीच्या प्रकाशमयी सणाला त्यांच्यातील कलाकारीला मोकळी वाट मिळाली आहे.