Pune News : वाहतूक नियमनासाठी हमालांची पोरं सरसावली! | पुढारी

Pune News : वाहतूक नियमनासाठी हमालांची पोरं सरसावली!

बिबवेवाडी : पुढारी वृत्तसेवा : गंगाधाम चौकातील बेशिस्त वाहनचालकांना आवर घालण्यासाठी हमालनगर येथील हमाल बांधवांची मुले सरसावली आहेत. या उपक्रमांतर्गत गेल्या चार दिवसांपासून वाहनचालकांत वाहतूक नियमांची जनजागृती करण्यात येत आहे. सणासुदीच्या काळात या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून हा उपक्रम राबविला जात असल्याचे रहिवाशांनी सांगितले.
मार्केट यार्डाकडून अनेक वाहनचालक विरुद्ध दिशेने येत असल्याने या रस्त्यावर अनेकदा अपघातही झाले आहेत.

दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिक सायंकाळच्या वेळी घराबाहेर पडत असल्याने गंगाधाम चौकात वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे वाहनचालक व पादचार्‍यांची मोठी गैरसोय होत आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी हमाल बांधवांची मुले सरसावली असून, ते स्वयंस्फूर्तीने गेल्या चार दिवसांपासून सायंकाळच्या वेळी गंगाधाम चौक परिसरात वाहतूक नियमन करीत आहेत. चुकीच्या बाजूने येणार्‍या वाहनचालकांना अडवून परत पाठविले जात आहे.

तसेच, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांना जनजागृतीही केली जात आहे. यामुळे परिसरात वाहतूक सुरळीत होण्यास मदत होत आहे. हमाल पंचायतीचे नामदेव मानकर म्हणाले की, वाहनांच्या संख्येच्या तुलनेत वाहतूक पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे गंगाधाम चौक परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. या ठिकाणी वाहतूक पोलिसांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. हमालनगरमधील मुले गेल्या चार दिवसांपासून वाहतूक नियमन करीत आहेत.

हेही वाचा

Back to top button