पुणे : पुढारी वृत्तसेवा : खुनाच्या गुन्ह्यात अटक केलेला संशयित हा अल्पवयीन असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायालयाने अल्पवयीन विधिसंघर्षित मुलाला बाल न्यायमंडळासमोर हजर करण्याचे आदेश दिल. गेल्या नऊ महिन्यांपासून तो येरवडा कारागृहात न्यायालयीन बंदी म्हणून बंदिस्त होता. मात्र, तो अल्पवयीन असल्याचे समोर आले असून, सत्र न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांनी आरोपीला बाल न्यायमंडलासमोर हजर करण्याचे आदेश दिले.
वारजे पुलाजवळ एक 40 वर्षांचा पुरुष बेशुद्धावस्थेत आढळून आला होता. त्याला उपचारासाठी दाखल करताना डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. वारजे माळवाडी पोलिसांनी मयताची ओळख पटवून त्याच्या मृत्यूला कोण कारणीभूत आहे, याची माहिती घेतली. त्यानुसार दि. 6 मे 2023 रोजी रात्री 11 वाजता आरोपीने त्याच्या जुन्या मोबाईल हॅण्डसेटचे पैसे न दिल्याने रागाच्या भरात त्याच्या गळ्यावर ब्लेडने व डोक्यावर मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला होता. साक्षीदाराने देखील आरोपीची पडताळणी केली. त्यावरून आरोपीला अटक केली.
आरोपी अल्पवयीन असल्याबाबत विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोक अभिरक्षक कार्यालयाचे मुख्य अॅड. प्रितेश खराडे व अॅड. मयूर दोडके यांच्यामार्फत सत्र न्यायालयात आरोपी अल्पवयीन असल्याबाबत अर्ज केला. त्याचा जन्म दाखला लक्षात घेऊन न्यायालयाने तो अल्पवयीन असल्याचे आदेश दिले व तपासी अधिकारी यांना आरोपीला ताब्यात घेऊन बाल न्याय मंडळात हजर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्याला बाल न्यायमंडळा समोर हजर केले होते.
हेही वाचा