कारवाईपेक्षा वाहतूक नियमन महत्त्वाचे : पोलिस आयुक्त | पुढारी

कारवाईपेक्षा वाहतूक नियमन महत्त्वाचे : पोलिस आयुक्त

पुणेः पुढारी वृत्तसेवा : ’शहरात वाहतूक कोंडी झालेल्या रस्त्यांवर किंवा चौकात पोलिसांनी वाहतुकीचे नियमन करणे अपेक्षित आहे. एकीकडे वाहतूक कोंडी झालेली असताना, दुसरीकडे पोलिस कर्मचारी दंडात्मक कारवाई करत असतील, तर ते खपवून घेतले जाणार नाही,’ असा इशारा पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी वाहतूक शाखेतील कर्मचार्‍यांना दिला आहे. दिवसेंदिवस शहरात वाहतूक कोंडी वाढते आहे. मेट्रोचे सुरू असलेले काम, वाहनांची वाढती संख्या, अपुर्‍या पायाभूत सुविधा अशी विविध कारणे आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलिस सतत वाहतूक कोंडी होणार्‍या स्पॉटचा अभ्यास करून तत्काळ उपायोजना करण्यावर भर देतील.

त्यानंतर दीर्घकाळ उपायोजना करणार येणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले. अमितेशकुमार म्हणाले, शहरात वाहतूक कोंडीची समस्या भीषण आहे. कोंडीच्या हॉटस्पॉटची माहिती घेत आहे. वाहतूक नियमन आणि बेशिस्तांवर दंडात्मक कारवाई, हे वाहतूक शाखेचे मुख्य काम आहे. मात्र, बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करताना नियमनाकडे दुर्लक्ष होणार नाही, याची खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. विशेषत: वाहतूक कोंडी झालेली असताना तेथे वाहतूक नियमन करणेच अपेक्षित आहे. त्यावेळेला कोणी बेशिस्त चालक आढळल्यास त्याचा फोटो काढून नंतर ई-चलन कारवाई करावी.

शहरात कोंडीच्या हॉटस्पॉटची माहिती घेतल्यानंतर नगर रस्त्यावर, विशेषत: वाघोली परिसरात कोंडीची समस्या मोठी असल्याचे कळाले. त्यानुसार वाघोली परिसरातील कोंडीचा अभ्यास करण्यात येत आहे. कोंडीमागील कारणांचा शोध घेतला जाणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसात तेथे जावून पाहणीदेखील करणार आहे. अभ्यासानंतर तातडीने करावयाच्या उपाययोजना पोलिसांकडून करण्यात येतील. तर, तांत्रिक उपाययोजना संबंधित विभागाच्या मदतीने करण्यासाठी पाठपुरावा करू, असेही त्यांनी सांगितले. नागरी वस्ती किंवा बाजारपेठेतील कोंडीच्या समस्येवर मात करण्यासाठी आवश्यक तेथे नागरिक आणि व्यापार्‍यांसोबत बैठका घेऊन उपाययोजनांबाबत चर्चा केली जाईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. तसेच, वाहतूक शाखेच्या अधिकारी-कर्मचार्‍यांसोबत पोलिस आयुक्त आज, मंगळवारी संवाद साधणार आहेत.

महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा

अनेक रस्त्यांवर भर चौकांत खड्डे किंवा अन्य प्रकारचे अडथळे असतात. अनेक ठिकाणी कॉर्नरला अतिक्रमणे असतात. त्याचा वाहतुकीला मोठा अडथळा होतो. या गोष्टी महापालिकेच्या मदतीने हटवणे शक्य आहे. अशा गोष्टींची पुरेशी माहिती घेवून महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button