समुद्रात 32 वर्षे तरंगणार्‍या बाटलीत होते ‘हे’ पत्र | पुढारी

समुद्रात 32 वर्षे तरंगणार्‍या बाटलीत होते ‘हे’ पत्र

न्यूयॉर्क : काही लहान मुलांना एखादी वस्तू किंवा पत्र लिहून ते काचेच्या बाटलीत घालून समुद्रात टाकण्याची हौस असते. अनेक वर्षांनी हे पत्र मिळाल्यावर काय गंमत होईल, अशी त्यांची भाबडी आशा असते. अशा अनेक बाटल्या आजपर्यंत मिळालेल्या आहेत. आता तर तब्बल 32 वर्षे समुद्रात तरंगत असलेली एक काचेची बाटली सापडली आहे. त्यामध्ये एक पत्र असून ते 1992 मध्ये न्यूयॉर्कमधील मॅटिटक हायस्कूलच्या नववीत शिकणार्‍या शॉन आणि बेनी नावाच्या विद्यार्थ्यांनी लिहिलेले आहे.

पृथ्वी विज्ञान प्रकल्पांतर्गत या विद्यार्थ्यांनी ही बाटली लाँग आयलंडजवळ अटलांटिक महासागरात टाकली होती. या पत्रात विद्यार्थ्यांनी ‘दिलेली माहिती भरा आणि बाटली दिलेल्या पत्त्यावर परत करा’ असे लिहिले होते. पत्रावर त्यांच्या शाळेचा पत्ता आहे. अ‍ॅडम ट्रॅव्हिस नावाच्या व्यक्तीला शिनेकॉक खाडीमध्ये हे बाटलीबंद पत्र सापडले. त्यानंतर त्याने मॅटिटक हायस्कूल माजी विद्यार्थी नावाच्या फेसबुक पेजवर बाटली आणि पत्राची छायाचित्रे शेअर केली. पत्र लिहिणार्‍या विद्यार्थ्यांपैकी एक असलेल्या बेनी डोरोस्कीने ही पोस्ट पाहिल्यावर तो जुन्या आठवणींनी भावूक झाला.

त्याने भूविज्ञान शिक्षक रिचर्ड ई. ब्रूक्स यांची आपल्या पोस्टमध्ये आठवण काढली. बेनीने लिहिले, मिस्टर ब्रूक्स हे अद्भूत शिक्षक होते. हे पत्र 32 वर्षांपूर्वीचे आहे यावर विश्वास बसत नाही. मला बाटली ज्यांना सापडली त्या व्यक्तीला भेटण्याची इच्छा आहे. अ‍ॅडमने त्याच्या कमेंटला उत्तर दिल्यावर त्याची ही इच्छा पूर्ण झाली. शिक्षक ब—ूक्स यांचा मुलगा जॉनही ही पोस्ट पाहून भावूक झाला! त्याचे वडील आता या जगात नाहीत.

Back to top button