Pune News : वितरिकेवरील अतिक्रमणामुळे अपघात वाढले

Pune News : वितरिकेवरील अतिक्रमणामुळे अपघात वाढले
Published on
Updated on

सांगवी : पुढारी वृत्तसेवा : सांगवी येथील वितरिकेवरील रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे. या अतिक्रमणामुळे दिवसेंदिवस अपघातात वाढ होत आहे. नागरिकांचे जीव गेल्यावर जलसंपदा विभागाला जाग येणार का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
बारामती तालुक्यातील सांगवी व शिरवली परिसरातील शेतीसाठी निरा डावा कालव्याच्या वितरिका क्र. 18 मधून सिंचनासाठी पाणी सोडले जाते. याच वितरिकेवरील उजव्या बाजूने शेतकर्‍यांना ये-जा करण्यासाठी रस्ता आहे. या रस्त्यावर एजगर पुलाच्या पूर्वेकडील भागात एका शेतकर्‍याने रस्त्यावर अतिक्रमण केले आहे.

त्यामुळे हा रस्ता एका बाजूला मोठ्या प्रमाणावर खचला आहे. रस्ता खचल्याने आजपर्यंत अनेक वाहनांना अपघात झाले आहेत. भविष्यात एखादा मोठा अपघात होऊन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वास्तविक, या ठिकाणी दोन शेतकर्‍यांचा हद्दीवरून वाद आहे. ही बाब जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत येते. गेल्या काही वर्षांपासून जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांनी हा प्रश्न गांभीर्याने घेणे गरजेचे होते. परंतु, तसे न झाल्याने या अतिक्रमणाचे भिजत घोंगडे तसेच पडले आहे.

या रस्त्यावरून ऊस वाहतूक, दूध वाहतूक तसेच शालेय विद्यार्थी ये-जा करीत असतात. दिवसेंदिवस वितरिकेवरील अतिक्रमण वाढत चालले असल्याने एखादा भीषण अपघात घडण्याची शक्यता बळावली आहे. या अतिक्रमणाचे स्थानिक राजकीय नेत्यांना कोणत्याही प्रकारचे सोयरसुतक नसल्याने तालुक्याचे लोकप्रतिनिधी तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या गंभीर गोष्टीसाठी संबंधित अधिकार्‍यांना सूचना केली तर काही वेळातच प्रश्न सुटणार आहे.

मोठी दुर्घटना टळली

अलीकडच्या काळात घरोघरी जाऊन गॅस सिलिंडर पोहच केले जातात. याच अतिक्रमण झालेल्या रस्त्यावर मागील आठवड्यात गॅस सिलिंडर भरलेला टेम्पो पलटी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सुदैवाने टाक्यांमधून गळती न झाल्याने सुमारे 70 गॅस टाक्यांचा स्फोट झाला नाही.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news