

पुणे : पुणे लोहमार्ग येथील राखीव पोलिस निरीक्षकांकडे दहा लाखांची खंडणी मागणाऱ्या एका युट्यूबर पत्रकारावर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. "तुमच्याविरुद्ध बातमी प्रसिद्ध करून, गुन्हा दाखल होईपर्यंत पाठपुरावा करत तुमची नोकरी घालवतो," अशी धमकी देत त्याने ही खंडणी मागितल्याचे समोर आले आहे. मुझम्मिल शेख (वय २९, रा. कोंढवा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पत्रकाराचे नाव आहे. तो 'टाईम्स ऑफ महाराष्ट्र' या युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक असल्याचे समजते.
याप्रकरणी पोलिस निरीक्षक भगवान विजयराव टोणे (वय ५७) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. मुझम्मिल सध्या फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. हा प्रकार ४ ते ६ ऑगस्ट दरम्यानच्या कालावधीत व्हॉट्सॲपद्वारे तसेच शिवाजीनगर येथील हॉटेल प्राईड येथे घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी टोणे हे राखीव पोलिस निरीक्षक म्हणून पुणे लोहमार्ग पोलिसांच्या खडकी येथील मुख्यालयात नेमणुकीस आहेत. ४ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता आरोपी पत्रकार मुझम्मिल शेख याने फोन करून, "तुमचे प्रशिक्षक यांनी प्रशिक्षणार्थी मुलींना रायफल आणि बांबूने मारहाण केली आहे. एवढी मोठी घटना घडली असताना, तुम्ही त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. तुमचे याकडे लक्ष नाही, मी तुमच्याविरुद्ध बातमी लावणार आहे," असे सांगितले. यावर टोणे यांनी, "आपल्याकडे अशी कोणतीच घटना घडलेली नाही. जर तुमच्याकडे याबाबत काही पुरावे असतील तर द्या, आम्ही कारवाई करू," असे स्पष्ट केले.
आरोपी शेख याने वारंवार फोन करून टोणे यांना भेटण्यास बोलावले. मात्र सुरुवातीला टोणे यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतरसुद्धा शेख त्यांना वारंवार फोन करून आपल्याकडे पुरावे असल्याचे सांगत असल्यामुळे टोणे त्याला भेटायला तयार झाले. टोणे त्यांचे सहकारी पोलिस हवालदार कांबळे यांना घेऊन शेख याला सायंकाळी सहा वाजता शिवाजीनगर येथील हॉटेल प्राईडमध्ये भेटले. त्यावेळी शेख याने टोणे यांना धमकावत, "तुम्ही मुख्यालयात काय करता? तुमच्याकडे हे काय चालले आहे? तुम्ही एक जबाबदार अधिकारी आहात," असे सांगून त्याच्या मोबाईलमधील काही फोटो दाखवले. हे फोटो आपल्याला तुमच्या मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनी पाठवले असल्याचे त्याने सांगितले. टोणे यांनी ते फोटो पाहिले असता त्यांच्या लक्षात आले की हे फोटो वेगळेच आहेत, त्यावरून कोणाला मारहाण करण्यात आल्याचे स्पष्ट होत नव्हते.
"मला अशा बातम्या न लावण्यासाठी पैशांच्या ऑफर असतात. एक बातमी न लावण्यासाठी ३५ लाखांची ऑफर होती," असे सांगून शेख याने टोणे यांना तणावात आणले. त्यानंतर, "हे प्रकरण मिटवायचे असेल तर मला दहा लाख रुपये द्या, अन्यथा ही बातमी लावून मी तुमच्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत पाठपुरावा करणार तसेच तुमची नोकरी घालवणार," अशी धमकी दिली. टोणे तेथून निघून आले. शेख याने दुसऱ्या दिवशी टोणे यांना काही बातम्या पाठवून दिल्या. तसेच 'रक्षकच बनले भक्षक', 'मुख्यालयातील तीन महिला पोलिसांना रायफल व बांबूने मारहाण' असे मेसेज पाठवून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. शेख टोणे यांना वारंवार "बातमी प्रसिद्ध करतो" असे म्हणून धमकावत होता.
शेवटी त्यांनी हा प्रकार लोहमार्गचे पोलिस अधीक्षक राजकुमार शिंदे यांच्या कानावर घातला. त्यांनी या घटनेची माहिती घेतली तेव्हा शेख हा टोणे यांना खंडणीसाठी धमकावून मानसिक त्रास देत असल्याचे निदर्शनास आले. त्याने केलेले कॉल आणि हॉटेलमधील भेटीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी पडताळून पाहिले. त्यानंतर टोणे यांनी थेट शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धाव घेत मुझम्मिल शेख याच्याविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिवाजीनगर पोलिसांचे पथक कॅम्प परिसरातील शेख याच्या कार्यालयात दाखल झाले, मात्र तो फरार झाल्याचे समोर आले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जाधव करत आहेत.