

पुणे: शहराला चालू वर्षासाठी (2025-26) लागणार्या पाण्याचे अंदाजपत्रक महापालिकेने तयार केले आहे. त्यानुसार पुढील वर्षभरासाठी 21.03 टीएमसी पाण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे करणार आहे. समान पाणी योजनेमुळे गळतीचे प्रमाण कमी होऊन 32 टक्क्यांवर आल्याने गतवर्षापेक्षा जवळपास अर्धा टीएमसी इतकी कमी मागणी या अंदाजपत्रकात महापालिकेकडून करण्यात आली आहे.
शहराला खडकवासला धरणासाखळीसह भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा होतो. शहराच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात महापालिका व पाटबंधारे विभाग यांच्यातील झालेल्या करारानुसार, वार्षिक 12.41 टीएमसी पाणी उपलब्ध करून दिले जाते. (Latest Pune News)
मात्र, महापालिकेत समाविष्ट झालेली गावे, स्थलांतरित झालेली लोकसंख्या आणि दररोज कामांनिमित्त शहरात येणार्यांची मोठी संख्या असल्याने पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मंजूर करारापेक्षा जादा पाणी महापालिकेकडून उचलले जाते. त्यामुळे राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार महापालिका दरवर्षी पाटबंधारे विभागाला पाण्याचे अंदाजपत्रक सादर करते. त्यानुसार शहराची 84 लाख 64 हजार लोकसंख्या असल्याचे स्पष्ट करीत महापालिकेने चालू वर्षासाठी 21.3 टीएमसी इतकी पाण्याची मागणी केली आहे.
महापालिकेच्या या पाणी अंदाजपत्रकातील महत्त्वाची बाब म्हणजे पाण्याच्या गळतीचे प्रमाण 32 टक्के म्हणजेच 6.73 टीएमसी इतके दाखविण्यात आले आहे. गतवर्षीच्या अंदाजपत्रकात ही गळती 35 टक्के म्हणजे 7.52 टीएमसी दाखविण्यात आली होती.
त्यामुळे गतवर्षात जवळपास पाऊण टीएमसी पाण्याची गळती कमी झाली आहे. त्यामुळे महापालिकेने यावर्षी पहिल्यांदाच गतवर्षीच्या मागणीच्या तुलनेत पाण्याची मागणी कमी केली आहे. गतवर्षी 21.48 टीएमसी पाण्याची मागणी केली होती. यावर्षी आता 21.03 टीएमसी मागणी केली आहे. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या मंजुरीनंतर हे अंदाजपत्रक पाटबंधारे विभागाकडे पाठविले जाणार आहे.
असे आहे महापालिकेचे वॉटर बजेट
शहराची लोकसंख्या 81.64 लाख
नियमित पुरवठा 11. 34 टीएमसी
टँकरने होणारा पुरवठा 0.193 टीएमसी
जलवाहिनीतून होणारा पुरवठा1.23 टीएमसी
समाविष्ट गावांमधील पुरवठा 0.975 टीएमसी
शहरातील ये-जा होणारी लोकसंख्या 3.88 लाख
ये-जा करणार्या लोकसंख्येसाठी पाणी 0.175 टीएमसी
व्यावसायिक आस्थापनांसाठी वापर 0.342 टीएमसी
पाण्याची गळती (32 टक्के) - 6.75 टीएमसी
एकूण पाण्याची मागणी 21.03 टीएमसी